सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (09:13 IST)

मोदींच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

उत्तर प्रदेशमध्ये योगींची जादू पुन्हा चालली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून सोहळा थेट दाखवण्याची योजना करण्यात येत आहे.
 
10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ केव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.