शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (11:15 IST)

खूशखबर.. मातृत्व रजा होणार आठ महिन्यांची!

नोकरी करणार्‍या महिलांसाठी मातृत्व रजेचा कालावधी ३ महिन्यांवरून वाढवून लवकरच आठ महिने करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या मंत्रालयाने यासंदर्भात कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, त्यावर सध्या विचार करण्यात येत आहे. 
 
महिलांना प्रसूतीनंतर स्वत:ची आणि त्यांच्या बाळाची योग्य काळजी घेता यावी, यासाठी सध्या त्यांना कायद्यानुसार ३ महिने सुट्टी देणे बंधनकारक आहे. परंतु हे तीन महिने पुरेसे नसल्याचे लक्षात आल्याने कामगार मंत्रालयाने ही मातृत्व रजा दुप्पट वाढवून सहा महिने करण्याचा विचार चालवला आहे. मात्र केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या दृष्टीने ही सहा महिन्यांची रजाही पुरेशी नसल्याने हा कालावधी आठ महिन्यांपर्यंत वाढवण्याची त्यांची मागणी आहे. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यासोबत त्यांनी याबाबत चर्चा केली आहे. प्रसूतीपूर्वी एक महिना आणि नंतर सात महिने, अशा प्रकारे नोकरदार महिलांना ही रजा मिळणार आहे. मूल दत्तक घेणार्‍या महिलांनाही ही रजेची सुविधा मिळावी, असा मनेका यांचा आग्रह आहे. संघटित आणि असंघटित अशा सर्वच क्षेत्रातील नोकरदार महिलांना या मातृत्व रजेचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी कामगार मंत्र्यांना केली आहे. मातृत्व लाभ कायदा १९६१ अंतर्गत सध्या प्रसूतीपूर्व दीड महिना आणि प्रसूतीनंतर दीड महिना अशी तीन महिन्यांची रजा मिळते.