मोदी आणि शरीफ एकाच हॉटेलात उतरणार
न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी अमेरिकेला जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ न्यूयॉर्कमध्ये एकाच हॉटेलात उतरणार आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का, याबाबत अधिकृतपणे काहीही माहिती देण्यास आलेली नसली, तरी याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
अमेरिकेतील वेळेनुसार नरेंद्र मोदी यांचे बुधवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये आगमन होत आहे. तर नवाज शरीफ शुक्रवारी संध्याकाळी तिथे पोहोचणार आहेत. दोन्ही नेते शहरातील प्रसिद्ध वॉलडॉर्फ अँस्टोरिया हॉटेलमध्ये उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये उतरत आहेत, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकासाचे धोरण’ या विषयावरील परिसंवादात मोदी यांचे शुक्रवारी भाषण होणार आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवार ते कॅलिफोर्नियाला जाणार आहेत आणि 28 तारखेला सोमवारी ते परत न्यूयॉर्कमध्ये परतत आहेत.
