राहुल, देशाला माकड बनवू नका: जेटली
नवी दिल्ली- ललित मोदी मदत प्रकरणावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चांगलीच खिल्ली उडवली. राहुल गांधी हे ‘एक्सपर्ट विदाउट नॉलेज’ असल्याचा टोमणा त्यांनी मारला आणि बिनबुडाचे मुद्दे उकरून देशाला अकारण माकड बनवू नका, असेही त्यांना सुनावले. त्यामुळे काँग्रेस-भाजपमधील वाक्-युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आपला राजीनामा मागणार्या विरोधकांना सुषमा स्वराज यांनी लोकसभेत सडेतोड उत्तर दिले. ललित मोदींकडून आपल्या मुलीला एक पैसाही मिळालेला नाही, ललित मोदी प्रकरणात मी काहीही चुकीचे केलेले नाही, काँग्रेसच्या चुकांमुळेच मोदी लंडनमध्ये आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, ‘राहुलजी, क्वात्रोचीकडून किती पैसे घेतले हे आधी मम्माला विचारा’, अशी सणसणीत चपराकही हाणली. परंतु त्यानंतरही, राहुल यांनी आपल्या भाषणात सुषमांना लक्ष्य केले. स्वराज यांनी लपूनछपून मानवता का दाखवली?, त्यांना किती पैसे मिळाले?, हे प्रश्न त्यांनी पुन्हा उपस्थित केले.