शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जुलै 2024 (10:34 IST)

ऑलिंपिक किती वर्षांनी होतं? आधुनिक ऑलिंपिकला सुरुवात कधी झाली?

tokyo olympics
"ऑलिंपिकमध्ये विजय मिळवणं नाही, तर सहभाग घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे, आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वांत महत्त्वाचं आहे."
 
आधुनिक ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांच्या या विधानात खेळांचंच नाही, तर जगण्याचं सूत्रही सामावलं आहे.
 
कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतूनच 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) ची स्थापना झाली होती. पण प्रत्यक्षात ऑलिंपिकचा इतिहास बराच जुना आहे.
 
प्राचीन ऑलिंपिक
प्राचीन ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व आठव्या शतकात म्हणजे सुमारे 2,700 वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. सुमारे 50,000 जण त्या खेळांसाठी हजेरी लावायचे, असे उल्लेख इतिहासात आहेत.
 
ग्रीक संस्कृतीत खेळांना, खेळाच्या स्पर्धांना महत्त्वाचं स्थान होतं आणि दर चार वर्षांनी होणारं ऑलिंपिक हा सर्वात मोठा सोहळा होता. अगदी आजच्यासारखाच.
 
पण ग्रीकांसाठी ऑलिंपिक हा एक धार्मिक उत्सवही होता. ग्रीक संस्कृतीत झ्यूस हा देवांचा राजा मानला जायचा. त्याच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया इथे या खेळांचं आयोजन केलं जायचं.
 
इथेच झ्यूसचं मंदिर होतं आणि त्यात त्याची सोनं आणि हस्तिदंतानं मढवलेली मूर्ती होती. तिथे धार्मिक विधीही होत असत, प्राण्यांचा बळी देण्याचीही प्रथा होती. काहीसं आपल्याकडच्या यात्रांमधल्या कुस्ती, कबड्डीच्या स्पर्धांसारखंच म्हणा ना.
 
फरक इतकाच की त्या काळी विजेत्यांना पदक किंवा पैसे नाही, तर ऑलिव्हच्या फांदीपासून तयार केलेला मुकुट दिला जायचा, आणि ते त्यांच्या गावी परतल्यावर मोठा मानसन्मान मिळायचा. खेळाडू आपल्या नगरराज्याची शान राखण्यासाठी खेळायला उतरायचे.
 
एरवी या नगरराज्यांमध्ये युद्धं, लढाया, भांडणं व्हायची. पण ऑलिंपिकच्या काळात 'पवित्र युद्धबंदी' लागू केली जायची. खेळाडू आणि प्रेक्षक ऑलिम्पियाला जाऊन सुखरूपपणे परत येऊ शकतील, यासाठी ही युद्धबंदी व्हायची. ऑलिंपिक स्पर्धा हे तेव्हापासूनच शांतीचं प्रतीक मानलं जातं.
 
ऑलिम्पियातले हे खेळ पाहण्यासाठी फक्त पुरुष, लहान मुलं आणि अविवाहित मुलींनाच परवानगी होती, लग्न झालेल्या स्त्रियांना तिथे जाण्यास मज्जाव होता. नियम मोडणाऱ्यांना कडेलोट करण्याची शिक्षा होत असे.
 
पण महिला आपल्या मालकीचे घोडे या ऑलिंपिकमध्ये रथांच्या स्पर्धेत उतरवू शकत होत्या. तसंच दर चार वर्षांनी झ्यूसची पत्नी हेराच्या सन्मानार्थ केवळ अविवाहीत महिलांच्या खेळाचं आयोजन केलं जायचं.
 
ग्रीक संस्कृतीचा प्रभाव ओसरत गेला, तसे हे खेळ मागे पडत गेले आणि काहींना त्यांचा साफ विसर पडला होता.
 
आधुनिक ऑलिंपिकचा जन्म
फ्रेंच जहागीरदार पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिम्पिकच्या आयोजनचा श्रेय दिलं जातं, पण त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली होती ती इंग्लंडंमधल्या वेनलॉक ऑलिंपिक गेम्समधून.
 
‘मच वेनलॉक’ गावी जन्मलेले डॉ. विल्यम पेनी ब्रुक्स यांनी आपल्या परिसरातील तरुणांना शिस्त लागावी, त्यांची तब्येत सुधारावी अशा उद्देशानं 1850 साली वेनलॉक ऑलिंपिक गेम्सची सुरुवात केली होती.
 
या वेनलॉक क्रीडास्पर्धांमधूनच पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या आयोजनाची प्रेरणा मिळाली होती. कुबेर्तान हे शिक्षणतज्ज्ञ होते. ते श्रीमंतही होते.
 
कुबेर्तान इंग्लंडमधल्या शाळांच्या कामाच्या पद्धतीवर संशोधन करण्यासाठी गेले असताना त्यांना तिथे खेळावर कसा भर दिला जातो, खेळातून मूल्यशिक्षण देता येतं आणि समाजाविषयी जागरुकता कशी निर्माण करता येते, याची जाणीव झाली.
 
कुबेर्तान यांचे फ्रान्समधल्या शाळांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न तेवढे यशस्वी झाले नाहीत. पण त्या सगळ्यांतून त्यांना प्राचीन ऑलिंपिकचं पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कल्पनेतल्या या ऑलिम्पिकमध्ये देशविदेशातले खेळाडू सहभागी होणार होते आणि आपापसातलं वैर विसरून खेळाच्या मैदानात उतरणार होते.
 
कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतून फ्रान्समध्ये 1894 साली 23 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. दोनच वर्षांत ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं.
 
पहिले ऑलिंपिक खेळ
एप्रिल 1896 मध्ये अथेन्सच्या पॅनाथेनिक स्टेडियममध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी 43 क्रीडाप्रकारांमध्ये फक्त 14 देशांचे जेमतेम 200 पुरुष खेळाडू सहभागी झाले होते.
 
पहिल्या ऑलिंपिक मध्ये टेनिस, ट्रॅक अँड फिल्ड, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, नेमबाजी, जलतरण आणि जिमनॅस्टिक्सचा समावेश होता. क्रिकेट आणि फुटबॉललाही त्या स्पर्धेत स्थान मिळालं होतं, पण पुरेशा खेळाडूंअभावी ते रद्द करावं लागलं.
 
चार वर्षांनी दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये काही खेळांत पहिल्यांदाच महिलांना स्थान मिळालं.
 
त्यानतंर पुढच्या 125 वर्षांत या क्रीडास्पर्धेनं बरेच चढउतार पाहिले आहेत, लोकांना खेळावर प्रेम करायला शिकवलं आहे आणि त्यांना संकटकाळात प्रेरणा दिली आहे.
 
ऑलिंपिक दर 4 वर्षांनी का होतं?
प्राचीन काळी ग्रीसमधल्या ऑलिम्पिया नगरीमध्ये दर 4 वर्षांनी खेळ म्हणजेच 'ऑलिंपिक' होई, आणि हीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली.
 
दोन ऑलिंपिकदरम्यानच्या 4 वर्षांच्या काळाला ऑलिम्पियाड म्हटलं जाई. आणि हे त्याकाळी कालगणनेचं मापही होतं. म्हणजे वर्षांऐवजी ऑलिम्पियाडमध्ये कालगणना केली जाई.
 
महिलांना ऑलिंपिकमध्ये केव्हापासून सहभागी होता येऊ लागलं?
1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये महिला पहिल्यांदा सहभागी झाल्या. हे दुसरंच ऑलिंपिक होतं.
 
या ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या 997 अॅथलीट्सपैकी 22 महिला होत्या.
 
टेनिस, सेलिंग, क्रोके (Croquet), इक्वेस्ट्रियानिझम (घोडेस्वारीशी निगडीत स्पर्धा), आणि गोल्फ या खेळ प्रकारांत महिला अॅथलीट्स सहभागी झाल्या.
 
2012मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचाही समावेश झाला तेव्हापासून ऑलिंपिकच्या सर्व क्रीडा प्रकारांत महिलांचा समावेश झाला. 1991पासून ऑलिंपिकमध्ये नवीन खेळाचा समावेश करण्यासाठी एक नियम करण्यात आला. महिला आणि पुरुष अशा दोन्ही अॅथलीट्सचा सहभाग ज्या खेळात असेल, तोच ऑलिंपिकमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
 
टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये कराटे, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, क्लाईंबिंग या खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला.
 
2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी 45% महिला होत्या.
 
2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी महिला खेळाडूंचं प्रमाण 50 टक्के एवढं म्हणजे समसमान झालं.
 
ऑलिंपिकचं बोधचिन्हं काय सांगतं?
एकमेकांत गुंफलेल्या पाच रिंगा हे ऑलिंपिकचं बोधचिन्ह आहे. याला ऑलिंपिक रिंग्स म्हटलं जातं. जगभरातल्या अब्जावधी लोकांचं प्रतिनिधित्व या रिंगा करतात.
 
ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांनी पहिल्यांदा हा लोगो तयार केला.
 
पाच खंडांचं द्योतक असणाऱ्या या रिंगा विविध रंगांच्या, पण समान आकाराच्या आणि एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. जगभरातल्या लोकांचं एकत्र येणं यावरून दर्शवतात.
 
पांढऱ्या पार्श्वभूमवीवरच्या या रिंगा निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगात असतात.
 
ऑलिंपिक डे म्हणजे काय?
ऑलिंपिक ही केवळ एक क्रीडास्पर्धा नाही, तर खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे.
 
ऑलिंपिक चळवळीचं हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वर्षातला एक दिवस ऑलिंपिक दिवस म्हणून साजरा केला जावा, असा प्रस्ताव पहिल्यांदा 1947 साली मांडण्यात आला होता.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतले चेकोस्लोवाकियाचे प्रतिनिधी डॉक्टर ग्रुस यांनी मांडलेली ही संकल्पना सर्वांनीच पुढे उचलून धरली आणि काही महिन्यांनी तिला मूर्त रूपही मिळालं.
 
तेव्हापासून 23 जून या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या स्थापना दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या एखाद्या सोयीस्कर दिवशी वेगवेगळ्या देशांतल्या राष्ट्रीय ऑलिंपिक समितींतर्फे त्या त्या देशात ऑलिंपिक डेचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
 
वय, वर्ण, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, सगळ्यांनाच म्हणजे अगदी अजिबात कोणताही खेळ न खेळणाऱ्या व्यक्तींनाही यात सहभाग घेता यावा, ही अपेक्षा ठेवली जाते. काही देशांत तर ऑलिंपिक डे हा शाळेतील महत्त्वाचा सोहळा बनला आहे.
 
2020-21 मध्ये कोव्हिडच्या जागतिक साथीनं सगळीकडे निराशेचं सावट पसरलेलं असताना तर ऑलिंपिक डेचं महत्त्व आणखी वाढलं.
 
अनेक आजी माजी ऑलिंपियन खेळाडूंनी या काळात लोकांना प्रेरणा दिली आहे, खेळानं लोकांच्या जगण्यात सकारात्मकता आणली आहे आणि शारिरीक तसंच मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठीही मदत केली आहे, असं IOC ने नमूद केलं होतं.