रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2024 (09:26 IST)

विनेश फोगाट : वडिलांचे निधन, आईचा कॅन्सर ते ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवण्याची हुकलेली संधी

मे 2003 मध्ये फोगाट भगिनींमधील गीतानं कॅडेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. महावीर फोगाट यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तिनं मिळवलेलं हे पहिलंच यश होतं. संपूर्ण बलाली गावानं गीताच्या यश साजरं केलं होतं.
 
त्यावेळेस महावीर फोगाट यांचे लहान भाऊ राजपाल यांनी देखील आपल्या मुलीसाठी अशाच यशाचं, कौतुकाचं स्वप्न पाहिलं होतं.
 
राजपाल फोगाट यांची मुलगी म्हणजेच आजची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट.
 
विनेश त्यावेळेस फक्त आठ वर्षांची होती आणि तिनं नुकतंच कुस्ती खेळण्यास सुरुवात केली होती.
20 वर्षांनंतर आज विनेश भारतीय महिलाशक्तीचं प्रतीक बनली आहे. शनिवारी (17 ऑगस्ट) पॅरिसहून परतल्यावर तिचं एखाद्या विजेत्याच्या थाटात स्वागत करण्यात आलं.
 
तिला सन्मान देण्यासाठी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते बलाली या तिच्या गावापर्यंतच्या 120 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.
 
हरियाणाच्या कोणत्याच खेळाडूच्या वाट्याला चाहत्यांनी केलेलं असं स्वागत आलेलं नाही. अगदी ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंच्या सुद्धा नाही.
 
हे सर्व दृश्य पाहताना दिवंगत राजपाल फोगाट यांच्याइतका आनंद दुसऱ्या कोणालाही झाला नसता! त्यांच्या लेकीसाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होण्याचा हा क्षण होता.
प्रत्येक वेळेस विनेशच्या कामगिरीमुळे देशाला जेव्हा अभिमान वाटतो, तेव्हा तिच्या कुटुंबातील काही जणांची दखल घेतली पाहिजे.
 
ते म्हणजे विनेशचे वडील, ज्यांनी आपल्या मुलींसाठी एक वेगळ्या आयुष्याचं स्वप्न पाहिलं. विनेशची आई प्रेमलता, विनेशचे काका आणि नंतर प्रशिक्षक झालेले महावीर फोगाट यांनी कुटुंबाचा दबाव आणि आजारपण असतानाही या स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष केला.
 
या सर्वांच्या एकत्रित परिश्रम आणि संघर्षामुळेच एक चॅम्पियन घडली. जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समोर येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करते आहे.
 
25 ऑक्टोबर 2003 च्या रात्री राजपाल यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून बलाली गावानं अनेकदा फोगाट भगिनींचं स्वागत, सत्कार केला आहे. यात विनेशचाही समावेश होता. मात्र, यावेळेस संपूर्ण देशानं विनेशची कामगिरी साजरी केली, तिचं कौतुक केलं.
 
विनेशच्या वडिलांचं स्वप्न
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 किलो वजनी गटात तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठल्यानंतर सुद्धा अंतिम सामन्याआधी फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं.
 
"विनेश ही फक्त बलाली गावाचीच लेक नाही, तर ती संपूर्ण देशाची मुलगी आहे," असं गीता फोगाट म्हणाली.
 
2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कुस्तीमध्ये भाग घेऊन गीता फोगाट ऑलिंपिक खेळणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती.
 
विनेश सांगते, "माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा मी पहिलीत होते. मी एक चॅम्पियन कुस्तीपटू बनावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. गीतानं जेव्हा एशियन कॅडेट चॅम्पियनशिप जिंकली तेव्हा गावात तिचं जल्लोषात स्वागत झालं होतं.
 
"तेव्हापासून माझं देखील असंच कौतुक व्हावं, सन्मान व्हावा असं माझ्या वडिलांना वाटायचं. जेव्हा प्रियंका आणि रितूबरोबर मी 2009 च्या एशियन कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं, तेव्हा आमच्या गावात आमचं जोरदार स्वागत झालं होतं.
 
"त्यावेळेस मला माझ्या वडिलांच्या इच्छेची आठवण झाली होती. ते जिथे कुठे आहेत तिथून मला नेहमीच शुभेच्छा देत असतात. माझ्या प्रत्येक विजयानंतर मला त्यांच्या इच्छेची आठवण होते."
 
महावीर फोगाट आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या कुस्तीपटूंवरील 'आखाडा' या पुस्तकासाठी आम्ही घेतलेल्या मुलाखतींपैकी एका मुलाखतीत विनेश या भावना व्यक्त केल्या होत्या.
"पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेशची कामगिरी कौतुकास्पद होती. ती अंतिम सामन्यात खेळू शकली नाही हे निव्वळ दुर्दैव होतं. मात्र माझ्यासाठी ती नेहमीच एक चॅम्पियन असेल," असं महावीर फोगाट म्हणाले.
 
ऑक्टोबर 2000 मध्ये मुलींना कुस्तीच्या खेळात उतरवून आपल्या कुटुंबात ऑलिंपिक विजेता खेळाडू असावा, असं स्वप्नं महावीर फोगाट यांनीच पाहिलं होतं. तोपर्यंत कुस्ती हा पुरुषांची मक्तेदारी असणारा खेळ होता.
 
महावीर फोगाट यांच्याप्रमाणेच राजपाल फोगाट देखील आपल्या मुलींच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलात आणि मुलींमध्ये कधीही भेदभाव केला नाही.
 
विनेश सांगते, "आमची आई जेव्हा आम्हाला घरातील कामं करण्यास सांगायची, तेव्हा आमचे वडील आमचा भाऊ हरविंदरला रागवायचे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की, इतर कुठेही लक्ष विचलित होऊ न देता आम्ही मुलींनी फक्त कुस्तीवरच लक्ष केंद्रित करायचं आहे.
 
"जर आमच्या आईला घर कामात काही मदत हवी असेल तर तिनं ती हरविंदरकडून घ्यावी, आमच्याकडून नाही. असं आमच्या घरातील वातावरण होतं."
 
आठवणींना उजाळा देत विनेश पुढे सांगते, "शाळेत असताना मी नेहमीच मुलींबरोबर भांडायचे, मारामारी करायचे आणि अगदी मुलांबरोबर देखील. आमची आजी आम्हाला सांगायची की कधीही स्वत:हून भांडण करू नका. मात्र जर कोणी तुमच्यावर दादागिरी केली, छेड काढली तर मात्र आम्ही ते खपवून घेता कामा नये.
 
"मग तो मुलगा असो की मुलगी मी कधाही कोणाला माझ्यावर दादागिरी करू दिली नाही. यामुळे अनेकदा याचा शेवट भांडणात, मारामारीत व्हायचा. आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, या गोष्टीचा माझ्या वडिलांना अभिमान होता.
 
"त्यांच्या निधनानंतर, माझ्या काकांनी (ताऊजी) देखील मला त्याच पद्धतीनं वाढवलं. त्यांनी आम्हाला आमच्या वडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही."
 
विनेशचं पितृछत्र हिरावून घेणारी काळरात्र
विनेशच्या वडिलांचा 25 ऑक्टोबर 2003 ला मृत्यू झाला.
 
दिवाळीच्या एक आठवडा आधीच करवा चौथच्या दिवशी त्यांचं निधन झालं. याच सणाच्या दिवशी भारतीय महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.
 
विनेशच्या आई प्रेमलता आपले पती राजपाल यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असताना त्यांनी या गोष्टीची कधीही कल्पना केली नव्हती त्यांचे पती त्यांना कायमचं सोडून जाणार आहेत. विनेशच्या आईनं उपवास सोडण्याच्या फक्त एक तास आधीच राजपाल यांचं निधन झालं.
 
राजपाल हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये बलाली ते दादरी रस्त्यावर ड्रायव्हिंगचं काम करायचं. सूर्यास्त झाल्यानंतर बलालीमध्ये काळोख पसरला. कारण तिथं रस्त्यांवर लाईट नव्हते. त्या रात्री दुर्दैवी घटना घडली.
 
राजपाल यांचा चुलत भाऊ मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता. त्याने राजपाल यांना कोणताही इशारा न देता त्यांच्यावर गोळी झाडली. राजपाल घराबाहेर बसलेले असतानाच त्यांच्या चुलत भावानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
 
पहिली गोळी राजपाल यांच्या छातीत शिरली आणि दुसरी गोळी डोक्याला लागली. त्यामुळे राजपाल यांचा जागीच मृत्यू झाला.
तो माझा शेवटचा करवा चौथ ठरला. मी सर्वस्व गमावलं होतं," असं प्रेमलता म्हणाल्या.
 
प्रेमलता पुढे सांगतात की, "माझे पती रक्ताच्या धारोळ्यात पडलेले होते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलांचे चेहरे येत होते. मी उद्ध्वस्त झालेले होते आणि कसं व्यक्त व्हायचं तेच मला कळत नव्हतं. त्यावेळेस मला असं वाटलं की माझा जगण्याचा उद्देशच संपला आहे.
 
"मात्र मला जाणीव झाली की माझ्या मुलांसाठी जगलं पाहिजे. अजून त्यांच्या आयुष्याची सुरुवात व्हायची होती."
 
विनेशला आपल्या आईच्या सर्व त्यागाची नेहमीच जाणीव असते, आठवण असते. त्यामुळे आपल्याला एक जागतिक दर्जाचा खेळाडू बनवण्यासाठी आपल्या आईनं जे काही केलं त्याबद्दल आभार मानण्याची एकही संधी ती सोडत नाही.
 
आईला कर्करोगाचं निदान
2004 च्या मध्यावर प्रेमलता फोगाट यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं.
 
प्रेमलता सांगतात, "विनेशच्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझी तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. जेव्हा प्रकृती खूपच ढासळली, तेव्हा मी भिवानीतील एका डॉक्टरांना दाखवलं. माझ्या तपासणीच्या वेळेस मला गर्भाशयाचा कर्करोग (Uterine Cancer) झाल्याचं निदान झालं.
 
"डॉक्टरांनी मला सांगितलं की कर्करोग शरीरात पसरला आहे आणि मी एक किंवा दोन वर्षच जगू शकेन. त्यावेळेस माझी मुलं खूपच लहान होती आणि मला त्यांच्या भविष्याची खूपच चिंता वाटत होती. त्यांच्यासाठी जगण्याची माझी इच्छा होती."
 
फोगाटांची काही घरं सोडली तर बलाली गावात सांगवान कूळाचीच बहुसंख्या आहे. प्रेमलता यांचा मुलगा हरविंदर याचं नाव राजस्थानातील जोधपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सांगवान कुटुंबातील एका मुलाच्या नावासारखंच होतं.
 
फोगाट कुटुंबाशी जवळीक असल्यामुळं त्यानं प्रेमलता यांना जोधपूर इथं पुढील वैद्यकीय उपचारांसाठी नेलं. तिथं त्यानं तिथल्या विभाग प्रमुखांची प्रेमलता यांची भेट घालून दिली.
प्रेमलता सांगतात, "हरविंदर सांगवान हा एक चांगला विद्यार्थी होता. त्याच्या प्राध्यापकांशी त्याचे चांगले संबंध होते. त्यानं जेव्हा माझी मुख्य डॉक्टरांशी ओळख करून दिली तेव्हा डॉक्टरांनी मला विचारलं की मला किती दिवस जिवंत राहायची इच्छा आहे. मी लगेचच उत्तर दिलं, पाच वर्षे.
 
"यामागचं कारण स्पष्ट करताना मी सांगितलं की, तोपर्यंत माझी मुलं स्वत:ची काळजी घेण्याइतपत मोठी झालेली असतील. डॉक्टरांनी मला धीर देत म्हटलं, चिंता करायची गरज नाही आणि मी माझ्या मुलांसोबत असेन. त्या डॉक्टरांचे आभार आणि परमेश्वराची कृपा, मी अजूनही माझ्या मुलांसोबत आहे."
 
पुढील महिनाभर प्रेमलता यांच्यावर रोहतकमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नियमितपणे केमोथेरेपी (Chemotherapy)झाली. रोहतक बलालीपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे.
प्रेमलता पुढे सांगतात, "जोधपूरमधील डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, मला चार आठवड्यांच्या केमोथेरेपीची आवश्यकता आहे. सुरुवातीचे दोन सत्र हरविंदर सांगवान मला रोहतकला घेऊन गेला. नंतर मात्र मी एकट्यानंच प्रवास केला.
 
"मला माझ्या मुलांच्या प्रशिक्षणाच्या वेळापत्रकात व्यत्यय आणायचा नव्हता. म्हणून मी एकटीच जात होते. माझी एकच इच्छा होती की त्यांनी खेळात यशस्वी व्हावं आणि ते त्याप्रमाणे झाले आहेत.
 
"हे सर्व महावीर फोगाट यांच्यामुळेच शक्य झालं. त्यांनी जर मुलांना कठोर शिस्त लावली नसती, खासकरून मुलींना, तर आज त्यांनी जे यश कमावलं आहे ते त्यांना मिळालं असतं असं मला वाटत नाही."
प्रेमलता आणि त्यांच्या दोन बहिणी दया कौर आणि निर्मला यांचा विवाह फोगाट कुटुंबात झालेला होता. तर मोठी बहीण दया कौर ही महावीर यांची पत्नी आहे आणि लहान निर्मलाचं लग्नं महावीर यांचा लहान भाऊ सज्जन यांच्याशी झालेलं आहे.
 
त्यामुळे महावीर यांचा राजपाल यांच्या मुलांशी मातृ आणि पितृ बाजूनं नातं आहे.
लांबसडक केसांवरील प्रेम
पॅरिसमध्ये विनेश आणि तिच्या टीमनं अंतिम सामन्यासाठी वजनी गटाच्या मर्यादेनुसार तिचं वजन कमी करण्यासाठी शक्य ते सर्वकाही केलं. अगदी तिचे केस देखील कापले, जेणेकरून काही ग्रॅम वजन कमी होईल.
 
खेळाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विनेशला आपले केस लांबसडक हवेत अशी इच्छा असायची. किशोरवयात प्रवेश करताना त्या वयातील इतर अनेक मुलींप्रमाणेच तिला लांबसडक केस वाढवण्याची इच्छा होती.
 
मात्र, महावीर फोगाट हे अतिशय कडक प्रशिक्षक आहेत. 2000 सालाच्या अखेरीस फोगाट मुलींना कुस्तीच्या खेळात उतरल्यापासून ते अतिशय कठोरपणे शिस्तीत प्रशिक्षण देत आहेत.
महावीर फोगाट यांनी त्यांच्या सर्व सहा प्रशिक्षणार्थी म्हणजे त्यांच्या चार मुली (गीता, बबिता, रितू आणि संगीता) आणि दोन पुतण्या (विनेश आणि प्रियंका) यांच्यासाठी काही नियम निश्चित केले होते.
 
महावीर यांच्या दृष्टीकोनातून कुस्ती हा खोलवर पाळंमूळं रुजलेला ग्रामीण खेळ होता. त्यामुळे त्याच्या काही परंपरांचं पालन केलंच पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यातील एक भाग म्हणजे छोटे केस. कारण त्यांची फारशी निगा राखावी लागत नाही.
 
लांब केसांबद्दल विनेश फोगाट सांगते, "2015 मध्ये मी ताऊजींपासून (महावीर फोगाट) पाच महिन्यांसाठी दूर एका शिबिरात होते. मला फक्त लांबसडक केसांची इच्छा होती. इतर कोणत्याही आरामदायी सुविधेची अपेक्षा नव्हती. मला फक्त लांब केस हवे होते.
 
"सुदैवानं मला त्या शिबिरात तसे ते वाढवता आले. मात्र सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतोच आणि लवकरच आमचं प्रशिक्षण संपून घरी जाण्याची वेळ आली.
"मी शिबिरातून परतेपर्यंत माझे केस चांगले लांब झाले होते, आता ते माझ्या खांद्यापर्यंत वाढले होते. मला वाटलं ताऊजी यावर आक्षेप घेणार नाहीत.
 
"घरी परतल्यावर आम्ही जेव्हा प्रशिक्षण सुरू केलं तेव्हा पहिल्या दोन-तीन सत्रात ते माझ्या केसांबद्दल एकही शब्द बोलले नाहीत. मात्र माझ्या मनात कुठेतरी मला या गोष्टीची जाणीव होती की ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे.
 
"अखेर तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात, त्यांनी माझ्या लांब केसांबद्दल मला विचारलं. मी गारठलेच होते. मी खाली मान घालून गप्प उभी राहिले.
 
"मात्र आश्चर्य म्हणजे त्यानंतर ते एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी फक्त माझ्या लांब केसांबद्दल विचारलं आणि तितकंच. अखेर मला लांबसडक केस ठेवण्याची परवानगी मिळाली होती. माझी दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण झाली होती."
 
पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेशला जरी अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं तरी महावीर फोगाट यांना तिचा अभिमान वाटतो.
 
"ऑलिंपिक पदक मिळवण्याचं माझं स्वप्नं अद्याप अपूर्ण आहे. मात्र विनेशनं खेळासाठी जे केलं आहे ते अतुलनीय आहे. पॅरिस ऑलिंपिकमधील तिची कामगिरी पोडियम जाऊन पदक स्वीकारण्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणून लक्षात ठेवली जाईल."
 
"तिच्या कामगिरीमुळे सर्व देशाची मान अभिमानानं उंचावली आहे," असं सर्व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून फोगाट भगिनींना कल्पनेपलीकडील आयुष्य देणारे महावीर फोगाट म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit