बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Updated : सोमवार, 29 जुलै 2024 (09:42 IST)

'या' टॅटूने मनू भाकरला संघर्षाच्या कठीण काळात दिली साथ, जाणून घ्या त्याचा अर्थ

'स्टिल आय राइज हे शब्द आणि त्यातल्या भावना माझ्या खेळाच्या कारकिर्दीशी अगदी चपखल बसणाऱ्या आहेत. म्हणून मी या कवितेच्या ओळीच गोंदवून घ्यायचं ठरवलं होतं.'
 
ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने आपल्या टॅटूबद्दलच्या या भावना सांगितल्या होत्या. एखाद्या खेळाडूसाठी स्वयंप्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते. त्याची प्रक्रिया उलगडून दाखवण्याचा प्रयत्न क्रीडा पत्रकार सौरभ दुग्गल यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून केला आहे.
 
भारतीय नेमबाज मनू भाकरसाठी टोकियो 2020 च्या ऑलिंपिकच्या वेळचा काळ खूप अवघड होता. ऐन स्पर्धेदरम्यान तिचं पिस्तुल नादुरुस्त झालं होतं. पण काहीही झालं तरी हार मानायची नाही, ही प्रेरणा तिला मिळाली.
 
त्या अर्थाचं एक टॅटू तिने तिच्या मानेवर गोंदवलं. त्यावरच्या अक्षरांप्रमाणेच 'Still I Rise' अशी प्रेरणा घेत ती या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेला सामोरी गेली आणि रविवारी भारतासाठी या स्पर्धेतलं पहिलं वहिलं पदक जिंकून दिलं.
 
मनू भाकरला पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळालं आणि तिने इतिहास रचला. ऑलिंपिक पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
 
10 मीटर एअर पिस्टल प्रकारात तिने हे पदक मिळवलं आणि त्याबरोबरच भारतासाठी पॅरिस ऑलिंपिकमध्ये विजयाचं खातंही उघडलं.
 
टोकियो ऑलिंपिकमध्ये तिचं पिस्तुलच बिघडल्याने ती धक्कादायकरीत्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली होती. त्या वेळी तिचा बॅड पॅच सुरू असतानाच तिला एका इंग्रजी कवितेने प्रेरणा दिली.
 
कवितेच्या प्रेरणादायी ओळी..
‘स्टिल आय राइज’ या लोकप्रिय कवितेतल्या या पंक्ती आहेत. मानवी हक्क कार्यकर्ती कवयित्री माया अँजेलो यांची ही गाजलेली कविता अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरली आहे.
 
अवघड परिस्थितीवर मात करण्याची, नैराश्यातून बाहेर पडून यशोशिखर गाठण्याची प्रेरणा या कवितेतून लाखो लोकांना मिळाली आहे.
 
भारतीय नेमबाज मनू भाकरने याच कवितेतील प्रेरणेच्या मदतीने कारकिर्दीतील अवघड काळावर मात करत ऑलिंपिक पदक पटकावलं.
 
“कुठल्याही क्रीडापटूसाठी यश आणि अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग असतं. पण तुम्ही अपयशाचा सामना कसा करता आणि त्यावर मात करत पुन्हा कशी उभारी घेता हे सगळ्यांत महत्त्वाचं ठरतं”, हे मनू भाकरचे शब्द आहेत.
 
ही भारतीय नेमबाज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र आणि 25 मीटर स्पोर्टस पिस्टल या प्रकारातही स्पर्धेत आहे.
 
16 व्या वर्षी राष्ट्रकुलचे सुवर्ण
गेल्या वर्षी चंदीगढमध्ये आर्यन मान फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मनू म्हणाली होती, “स्टिल आय राइज – हे माझ्यासाठी निव्वळ शब्द नाहीत. ती प्रक्रिया आहे - अपयशाच्या खाईतही स्वमूल्य ओळखण्याची. हे शब्द माझी मोठी प्रेरणा आहेत. काहीही झालं तरी, कितीही अपयश आलं तरी मला विश्वास आहे मी त्यातून मार्ग काढत शिखर गाठणार - हा विश्वास, ही प्रेरणा मला या शब्दांनी दिली. ”
 
मनू भाकर ही हिने वयाच्या 16 व्या वर्षीच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. एवढ्या लहान वयात या स्पर्धेत सुवर्णगवसणी घालणारी ती पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली होती.
 
त्यानंतर 2018 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात तिने गोल्ड कोस्ट गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर नेमबाजीतला तरुण तारा म्हणून ती ओळखली जाऊ लागली कारण या हरियाणाच्या मुलीने एका पाठोपाठ पदकं जिंकण्याचा सपाटा लावला.
 
2020 च्या टोकयो ऑलिंपिकपूर्वी (Covid मुळे ही ऑलिम्पिक स्पर्धा 2021 ला झाली होती) झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मनूने 9 गोल्ड मेडल्स आणि 2 सिल्वर मेडल्स अशी लक्षवेधी कामगिरी केली होती.
 
तिचा त्या वेळचा जबरदस्त फॉर्म पाहता टोकियो ऑलिंपिकसाठी भारताला पदक मिळवून देऊ शकेल असा आश्वासक चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. पण तिच्या लाडक्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात ती अपेक्षांना खरी उतरली नाही.
 
मिक्स टीम इव्हेंटमध्येही तिने निराशा केली आणि 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ती पोहोचू शकली नाही. त्यापूर्वीच्या प्राथमिक फेरीतच ती बाद झाली.
 
अपयशाचा काळ
ऑलिंपिकमधल्या घोर अपयशानंतर मनू भाकरची कारकीर्दच धोक्यात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तिची राष्ट्रीय संघात 10 मीटर एअर पिस्तुलसाठीच्या गटात निवडही झाली नाही.
 
हरवलेला फॉर्म परत यावा यासाठी मनू टोकियो ऑलिंपिकनंतर अक्षरशः झगडत होती. यंदाच्या ऑलिंपिकपूर्वी मार्चमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 25m पिस्तुल प्रकारात मिळालेल्या ब्राँझ पदकावर तिला समाधान मानावं लागलं.
 
2022-23 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सांघिक कामगिरी करताना तिच्या संघाला दोन पदकं मिळाली होती तेवढीच. याउलट टोकयो ऑलिंपिकपूर्वी तिच्या नावावर वर्ल्ड चॅम्पियनशिपची 11 पदकं होती.
 
आपल्या कारकिर्दीतील यशापयशाबद्दल बोलताना मनू म्हणाली होती, “तुम्ही अपयशाच्या दरीत असताना एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कधीही हार मानून लढाई सोडून द्यायची नाही. आपली मेहनत सुरू ठेवायची, त्यातूनच मोठं यश मिळतं.”
 
आत्मविश्वासाचे प्रतीक
पॅरिस ऑलिंपिकमध्ये पहिल्या ब्राँझ पदकानंतर आता 25m स्पोर्टस पिस्तल विभागात आणि 10m एअर पिस्तुलच्या सांघिक स्पर्धेतही पदक मिळवण्याचं तिचं लक्ष्य आहे.
 
“टोकियो ऑलिंपिकमध्ये जे झालं त्यानंतर त्यातून बाहेर पडण्याचा काळ माझ्यासाठी भयंकर अवघड होता. पण मी पुन्हा विजयी होणार याचा मला विश्वास होता. मी वर येईन हा मला आत्मविश्वास होता. स्टिल आय राइज हे शब्द आणि त्यातल्या भावना माझ्या खेळाच्या कारकिर्दीशी अगदी चपखल बसणाऱ्या आहेत. म्हणून मी या कवितेच्या ओळीच गोंदवून घ्यायचं ठरवलं”, मनू सांगते.
 
“मला हे टॅटू (Still I Rise) करून घ्यायची इच्छा बरेच दिवस होती. पण हे परमनंट टॅटू असल्याने नेमकं कुठे हे गोंदवून घ्यायचं याविषयी माझं पक्क ठरल्यानंतरच ते करण्याचा माझा विचार होता. शरीराच्या कुठल्याही दर्शनी भागात हे टॅटू काढून घ्यायचं नव्हतं. कारण ते अति दिसायला नको होतं.
 
"कारण कालांतराने ते सातत्याने डोळ्यापुढे दिसून त्याचा उचित परिणाम झाला नसता. म्हणून मी ते मानेवर गोंदवून घ्यायचं ठरवलं. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये मी हे टॅटू गोंदवून घेतलं. काय सांगू काय भावना होत्या... टोकियो हा आता भूतकाळ आहे आणि मी त्यातून वर येणार आहे," मनू सांगते.
 
तिने सांगितल्याप्रमाणेच तिने या भुतकाळावर मात केली आणि भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील पदकाचे खाते उघडून दिले.