शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. फिलिपाईन्स डायरी
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (10:40 IST)

'द किस्ट्रिक्सव्हेन' ही पृथ्वीवरील सर्वांत सुंदर रोड ट्रिप का आहे?

सुट्यांचा हंगाम सुरू झाल्यानं  जगभरातील पर्यंटक पर्यटनासाठी निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं आम्ही एका अवस्मरणीय अशा रोड ट्रिपची गोष्ट याठिकाणी सांगत आहोत.
 
स्टिकलस्टॅड शहरापासून ते आर्क्टिकमधील बोदा शहरापर्यंतचा 670 किलोमीटरचा सागरी किनारी मार्ग हा दोन अत्यंत भिन्न जगांदरम्यानचा प्रवास आहे. शिवाय ही या पृथ्वीवरील सर्वांत सुंदर अशी रोड ट्रिपदेखील आहे.
 
याच्या एका टोकाला सेंट्रंल नॉर्वेचा शांत सुसंस्कृतपणा आहे. त्यात सुंदर अशी उत्तमप्रकारे जपलेली हिरवळ आणि लाल रंगाच्या लाकडाची लहान लहान घरं लक्ष वेधून घेतात. तर दुसऱ्या बाजूचा विचार करता उत्तरेकडील स्वच्छ, निर्मळ सौंदर्य पाहायला मिळतं.
 
हिमनद्या, बर्फाच्छदीत पर्वत आणि दूरपर्यंत अत्यंत निर्मनुष्य क्षितीज असं ते दृश्य असतं. या दोन टोकांना जोडणारा मार्ग म्हणजे किस्ट्रिक्सव्हेन. याला किनारी मार्ग किंवा Fv17 असंही म्हणतात.
 
सागरी किनाऱ्याच्या अगदी लागून असलेला हा मार्ग आहे. आर्क्टिकपर्यंत ओबडधोबड वाटणारा आणि जणू रस्त्यांचं विणकाम सुरू आहे असं भासणारा असा हा मार्ग आहे.
 
स्कॅन्डिनेव्हियन देशाला युरोपातील सर्वांत सुंदर परंतू तेवढ्या कठीण अशा किनारपट्टीचा आशीर्वाद लाभलाय. गोठणाऱ्या आर्क्टिकपासून देशाला संरक्षण देणाऱ्या कवचाप्रमाणं हा मार्ग चारही बाजूंनी वेढलेला आहे. तसंच नॉर्वेची किनारपट्टी ही काहीशी विखुरलेली वाटते.
 
कारण त्या मार्गावर असलेली बेटं आणि अत्यंत खोल अशा दऱ्यांना कापून ही किनारपट्टी किंवा मार्ग पुढं सरकतो. अशा प्रकारच्या किनारपट्टीला लागून एखादा रस्ता असणं हेच अशक्य वाटतं. थोडक्यात सांगायचं झाल्यास हा एखादा चमत्कार वाटतो. 
आधुनिक नॉर्वेची कथा सुरू झाली ते ठिकाण म्हणजे स्टिकलस्टॅड. याचठिकाणी ईसवीसन 1030 मध्ये ख्रिश्चन राजा ओलाव्ह हराल्डसन वायकिंग लष्कराकडून मारला गेला होता. स्पष्टपणे पराभूत होऊनही ओलाव्ह आणि त्याचा मृत्यू हे कारण ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी प्रेरणा ठरलं.
 
एकसंध नॉर्वेच्या संघर्षातील ते निर्णायक वळणही ठरलं. कारण या लढाईमुळं वायकिंग नॉर्वे आणि त्यांच्या प्रमुखांच्या अंताची सुरुवात झाली होती.
 
1164 मध्ये पोप अलेक्झांडर तिसरे यांनी ओलाव्ह यांना संतत्व बहाल केलं आणि तेव्हापासूनच, लढाई झाली त्या ठिकाणासह ओलाव्हची समाधी असलेलं ट्रॉन्डहाईम कॅथड्रल हे ठिकाणदेखील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
 
स्टिकलस्टॅड हे ठिकाण माझा प्रवास सुरू करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण होतं. त्याचं कारण म्हणजे उत्तरेकडे जाणारा किस्ट्रिक्सव्हेन हा मार्ग. नॉर्वेचे लोक स्वतःकडं किंवा त्यांच्या देशाकडं कशा दृष्टीनं पाहतात हे दाखवणारा हा मार्ग आहे.
युरोपातील अगदी मोजक्या किंवा एखाद्याच देशानं नॉर्वेप्रमाणं त्यांच्या सीमेच्या दरम्यानची भूमी मिळवण्यासाठी प्रचंड आव्हानांचा सामना केला. नॉर्वेच्या नेत्यांनी शतकानुशतके स्टिकलस्टॅडच्या कथेच्या माध्यमातून देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
 
मध्ययुगातील भूतकाळ मागं सोडत त्यांनी एकसंध, स्वतंत्र आणि ख्रिश्चन देश अशी मजबूत राष्ट्रीय ओळख निर्माण केली. तर त्यांच्या रस्ते तयार करणाऱ्यांनी आणि मार्गदर्शकांनी किस्ट्रिक्सव्हेन सारखा सुंदर मात्र दुर्गम मार्ग तयार करण्यासाठी समोर उभ्या ठाकलेल्या प्रचंड आव्हानांचा सामना केला. त्यात आर्क्टिक आणि आर्क्टिकशी संलग्न भागातील हवामानाच्या मोठ्या आव्हानांचाही समावेश होता.
 
"आम्ही भूमी जिंकलीय" (We won the land) हा  जणू त्यांचा राष्ट्रीय मंत्र आहे. या संपूर्ण देशात संग्रहालयांमध्ये या वाक्याच्या भोवती फिरणारी प्रदर्शनं आयोजित केली जातात. नॉर्वेचा योग्य सांभाळ करत त्याला राहण्यायोग्य कसे बनवले, हेच या माध्यमातून सांगितलं जातं.
 
"जर माऊंट एव्हरेस्ट नॉर्वेमध्ये असतं तर, आम्ही शिखरावर जाण्यासाठीही मार्ग तयार केला असता," असं  स्टिकलस्टॅडच्या इतिहासकार मेट लार्सन यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं.
सुरुवातीला त्यांना काय म्हणायचे आहे याची कल्पना करणं मला कठीण गेलं. मी स्टिकलस्टॅडकडून उत्तरेकडे निघालो तेव्हा स्टेंकजर या शहरापर्यंत किनाऱ्याला अगदी लागून असलेला ग्रामीण भागातील रस्ता आम्हाला भेटला. स्टेंकडरच्या पुढं नॉर्वे अरुंद होत गेला  तसा आर्क्टिकच्या दिशेनं किस्ट्रिक्सव्हेन मार्गानं एक पडीक आणि लोकवस्ती नसलेला मोठा भूभाग जणू मधातून कापला होता, असं वाटलं.
 
त्यानंतर जसजसा जंगली प्रदेश वाढत गेला आणि मानवाच्या अस्तित्वाची शक्यता अगदीच कमी झाली तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की, या किनारपट्टीला लागून कोणताही मार्ग तयार करणं हे मानवी कल्पनाशक्ती आणि चिकाटीचा विजय ठरू शकतं.
 
"नॉर्वेमध्ये जर डोंगर किंवा पर्वतासारखा एखादा अडथळा निर्माण झाला तर आम्ही त्याच्या वरून, भोवती रस्ता बांधतो किंवा त्यावरून पूल बांधतो किंवा त्याच्या खालून भुयारी मार्ग तयार करतो," असं लार्सन म्हणाल्या.
 
"आमच्याकडे जगातील सर्वात लांब भुयारी मार्ग आहेत. इतरांना अशक्य वाटते, अशा ठिकाणी आम्ही रस्ते तयार केले आहेत. त्यातही आम्हाला जिथं भुयारी मार्ग बांधता येत नाही तिथं आम्ही जहाजाचा (फेरी) वापर करतो."
 
लार्सन यांनी सांगितलं की, 20 व्या शतकाच्या मध्यामध्ये रस्ते बांधणीचे प्रकल्प हे राष्ट्र बांधणीप्रमाणेच, त्या देशाचं चारित्र्य निर्माण करणारेदेखील होते. 1939 मध्ये बेरोजगार तरुणांना 108 किलोमीटरच्या सोगनेजेलेट या रस्त्याच्या बांधणीच्या कामावर लावण्यात आलं होतं.
 
हा मार्ग सध्याचे जोटनहेमन नॅशनल पार्क आणि नॉर्वेच्या वरून जाणारा असा होता. काही वर्षांनंतर 1940 मध्ये सुमारे 1,50,000 कैदी आणि बेरोजगारांना असंच एक आव्हानात्मक काम सोपवण्यात आलं. ते होतं किस्ट्रिक्सव्हेनच्या किनारपट्टीवर रस्ता तयार करण्याचं काम.
 
त्यांच्यासमोर येणारे काही अडथळे अगदी लवकरच स्पष्ट झाले. फार लांब नव्हे तर ब्रनयसुंड शहराच्या आधीच त्यांना अडथळे समोर आले. याठिकाणी पाण्यावर दिसणारी उठावदार अशा रंगांनी रंगलेली लाकडी घरं शहराच्या मध्यभागी दिसत होती. तर मोठ्या दगडी टेकड्यांनीदेखील मार्ग अडवला होता.
 
त्यामुळं दुसरा मार्ग शोधणं भाग होतं. किनाऱ्यापासून काही अंतरावरच असाच एक समूह म्हणजे टॉर्घटन एका बेटावरून बाहेर आलेला दिसला. ते दगडात गोठलेल्या आणि शहराकडे पाहणाऱ्या एखाद्या वेताळासारखा दिसत होता. पण ढग पुन्हा आत गेले की ते अदृश्य होत होतं, जणू त्याचा लपंडावाचा खेळ सुरू होता.
ब्रनयसुंडच्या पलीकडं मी दगड, बर्फ, पाणी आणि टेकड्या यांच्यातून निर्माण झालेल्या सुंदर भागातून प्रवास केला. प्रत्येक किलोमीटरचं अंतर ओलांडल्यानंतर रस्त्याची उंची वाढत होती. सँडनेसजन या लहान शहरापर्यंत पोहोचताना संपूर्ण मार्गावर जमिनीचा भाग वाढत असलेला जाणवत होतं.
 
ब्रनयसुंडला जगातील या एका वेताळासारख्या दिसणाऱ्या टेकडीमुळं ओळख मिळाली तर सँडनेसजनला अशा सात टेकड्यांसाठी ओळख मिळालीय. याठिकाणी असलेली सात शिखरं (सेव्हन सिस्टर्स माऊंटन पिक) जी 910 ते 1072 मीटर उंचीची आहेत. ही शिखरं म्हणजे, सिव्ह सस्त्रेद्वारे दिलेली शिक्षा भोगणाऱ्या सात महिला वेताळ आहेत, अशी स्थानिकांमधील अख्यायिका आहे.
 
नॉर्वेमधील लोक जसे अशक्यप्राय रस्ते निर्माण करण्यासाठी ओळखले जातात तेवढेच अशा कथांसाठीदेखील त्यांची ओळख आहे. "आम्हाला परिश्रम करायला आवडते," असं लार्सन यांनी मला सांगितलं.
 
"पण आम्हाला गोष्टी सांगायलाही आवडतं. तुम्ही प्रवास करताय त्या मार्गावरील दृश्यं पाहा. ती पाहिल्यानंतर तुम्ही वेताळ, परिकथा आणि गूढ कथांवर कसा विश्वास ठेवणार नाही? या अशा गोष्टी आहेत, ज्या आम्ही आमच्या मुलांना सांगतो. आमच्यापैकी अनेकांचा त्यावर विश्वासही आहे."
 
त्या मस्करी करत होत्या की खरं बोलत होत्या, हे सांगणं मात्र कठीण आहे.
 
हेल्गलंडब्रुआ (हेल्गलंडचा पूल) ओलांडत रस्ता उत्तरेकडं पुढं सरकत होता. या पुलामुळं एरव्ही सुमारे तासभर लागेल असा प्रवास किंवा अंतर पाच मिनिटांत पार करणं शक्य झालं होतं. उन्हाळ्यातही सगळीकडं बर्फाच्छदीत पर्वत डोकं वर काढू लागले होते. मी अद्याप आर्क्टिकमध्ये प्रवेशही केला नव्हता.
 
तरीही झाडांचा लवलेशही नसलेला उंचच उंच पठारांमधून जाणारा रस्ता हा, जणू आर्क्टिक प्रदेशाला आव्हानच देत होता. त्यानंतर हा मार्ग तलाव आणि दरी असलेल्या भागात शिरला. सगळीकडं पाणीच पाणी होतं. 
 
लोव्हंग या लहानशा गावात जाऊन पाण्याच्या किनाऱ्यावर हा रस्ता संपला. तिथं एकंही पूल नव्हता आणि कोणत्याही दिशेला पुन्हा रस्ता सुरू होतो हे दिसणं अशक्य होतं. शिवाय एखादं भुयारही दिसत नव्हतं. पण कारची एक लांबच लांब रांग होती. फेरी म्हणजे जहाजाची वाट पाहणाऱ्या कारची ही रांग होती. आम्ही त्या रांगेत लागलो.
मी दरम्याच्या काळात जूस्ट आणि अॅनेक विस्सेर या डचमधील कॅम्परव्हॅद्वारे प्रवास करणाऱ्यांशी चर्चा केली. ते पाचव्यांदा किस्ट्रिक्सव्हेनच्या या मार्गावरून प्रवास करत होते. (तुम्ही किस्ट्रिक्सव्हेनमध्ये वर्षभर कधीही येऊ शकता, पण उन्हाळ्यात (समर सीझन) हा प्रवास करणे सर्वात उत्तम.)
 
"आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा, काही तरी एवढं सुंदरही असू शकतं यावर आमचा विश्वासच बसला नाही," असं जूस्ट यांनी म्हटलं. "पण आता जोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून प्रवास करत नाही, तोपर्यंत आम्हाला सुट्ट्या आल्या आहेत, असं जाणवतच नाही."
 
ही युरोपातील सर्वांत खास आणि प्रेक्षणीय किनारपट्टी आहे. प्रत्येकवेळी इथं आल्यानंतर आल्याला काहीतरी नवा अनुभव मिळत असतो.
 
अॅनेकनंही हे मान्य केलं. "हा युरोपातील सर्वात सुंदर किनारा आहे. जूस्टला पहिल्यावेळी इथं यायचं नव्हतं. पण आता त्याला इथं आल्याशिवाय करमतच नाही. ते अगदी योग्यही आहे. प्रत्येकवेळी आम्ही या रस्त्यावरून प्रवास करतो, तेव्हा आम्हाला काही तरी, नवं आढळत असतं."
 
नॉर्वेमधील सर्वच फेरीप्रमाणे आमची बोट अगदी वेळेवर आली आणि स्कॅन्डिनेव्हियन ओळखले जातात त्याच तत्परतेनं लोडिंग आणि अनलोडिंगही वेगानं झालं. दूर अंतरावर नेस्ना या नॉर्वेच्या आणखी एका लहानशा गावात खोल दऱ्यांनी वेढलेला रस्ता होता.
 
पाण्याच्या दिशेनं असलेल्या काठापासूनचं अंतर हे अगदी काही मीटरचं होतं. दगडी कुंपण आणि केबिन्स ओलांडताना उत्तर युरोपातील सीमेवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येत होता.
 
स्टॉकव्हगन या लहानशा गावाच्या पलीकडं किस्ट्रिक्सव्हेननं ग्रन्सविकमधील दुसऱ्या महायुद्दाछ्या काळातील एक किल्ला ओलांडला. रस्त्याने जाताना अनेकदा असं वाटलं की, आता पुढे जाण्यासाठी मार्गच नाही.
 
कारण ठिकठिकाणी मोठे पर्वत, पाणी यामुळं रस्ते अडवलेले होते. पण प्रत्येकवेळी अगदी अखेरच्या क्षणी लक्षात येत होतं की, नॉर्वेमध्ये रस्ते तयार करणाऱ्यांनी असे पर्याय शोधून काढले आहेत, ज्यामुळं अगदी पर्वतांनी वेढलेल्या भागातूनही पुढं जायला आम्हाला मदत केली.
 
प्रवासात एका टप्प्यावर, खऱ्या आर्क्टिकच्या कुशीमध्ये एका दृश्यानं मला रस्त्याच्या कडेला थांबायला भाग पाडलं. खोल आणि निळाशार पसरलेला असा समुद्र होता. किनाऱ्यावर पर्वतरागांची गर्दी होती, तर दुसऱ्या बाजुला समुद्रातून डोकं वर काढणारी बेटं होती. जणू पृथ्वीच्या शेवटच्या टोकाच्या प्रवासावरील हा अखेरचा थांबा असावा असं वाटत होतं.

सुमारे तासभराच्या किल्बोघम आणि जेक्तविक दरम्यानच्या फेरी प्रवासात एक दरी आम्ही ओलांडली. मोकळ्या समुद्रात प्रवासाचा असा तो अनुभव होता. दूरवर दिसणारं क्षितीज हे टोकदार अशा टेकड्यांनी भरलेलं दिसत होतं. नजर जाईल तिथपर्यंत असंच दृश्य.
 
नॉर्वेचे प्रसिद्ध साहित्यक हेन्रिक इब्सेन यांनी एकदा नॉर्वेचं वर्णन "महालांवर महालांचे ढीग" असलेला उंच देश असं केलं होतं. त्याचा अर्थ नेमका काय तो मला समोरचं दृश्य पाहून समजला होता. 
 
किल्बोघम सोडल्यानंतर काही वेळानं पण फेरी जेक्तविकला पोहोचण्यापूर्वी आम्ही आर्क्टिक सर्कल पार केलं. या रेषेच्या उत्तरेला वर्षातील सर्वात लहान दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला सूर्यच उगवत नाही. तर 21 जूनला सूर्यास्त होत नाही. 
 
या मार्गावरील सहा फेरींपैकी प्रत्येक फेरीचा प्रवास काहीसा सारखाच, म्हणजे आर्क्टिक सर्कल ओलांडण्यासारखाच वाटला. नकाशावरच्या रेषा पाहून फार काही फरक वाटत नाही.
 
पण इथं पर्वत फारच उंच आणि प्रचंड प्रमाणात बर्फ तसंच निळ्या रंगाची अत्यंत गडद छटा आपल्याला पाहायला मिळते. त्याशिवाय आणखी एक म्हणजे, नॉर्वेच्या सर्वात मोठ्यांपैकी एक असं विशाल स्वार्टिसन आयकॅप हे पर्वताच्या त्या भिंतीच्या दृश्याच्या मागं लपलेलं आहे.
 
या ठिकाणी हिमनद्या पर्वतावरून खाली दरीच्या दिशेनं वेगानं वाहताना दिसतात. भूतकाळात हिमपर्वतांमुळंच त्याची निर्मिती झालेली आहे. याठिकाणी असलेल्या काही दरी सुमारे एक किलोमीटर खोलीच्या आहेत.
 
एका अत्यंत सुंदर अशा प्रवासाचा शेवट जवळ आला होता. बोदाच्या दिशेनं जाणाऱ्या अखेरच्या मार्गावर वाहतूक आणि रस्त्याच्या कडेच्या इमारतींचं प्रमाण हळू हळू वाढत होतं. पण पुढं आणखी एक आश्चर्य पुढं वाट पाहत होतं. पृथ्वीवरील सर्वात मोठी भरती आणि ओहोटी होणारं ठिकाण म्हणजे, सॉल्टस्ट्रॉमन.
 
एखाद्या आडव्या धबधब्याप्रमाणं संपूर्ण जगाकडं पाहणाऱ्या 3 किलोमीटर लांब आणि 150 मीटर रुंद सॉल्टस्ट्रॉमन याठिकाणी दर सहा तासांनी 40 कोटी घनमीटर पाण्याची भरती ओहोटी निर्माण होते.
 
याठिकाणी सर्वाधिक ऊर्जा निर्माण होते तेव्हा तयार होणारा भोवरा एवढा भयावह असतो की, तो सर्वकाही स्वतःमध्ये गिळंकृत करुन घेईल की काय? असं वाटल्याशिवाय राहत नाही. आता हे नॉर्वेमध्ये असल्यामुळं त्यावर एक पूल आहे. या पुलावरून खाली वाहणाऱ्या पाण्याकडं पाहताना, चक्कर आली नाही तर नवलच.
 
हे सर्व एका ट्रिपमध्ये अनुभवणं हे अत्यंत नाट्यमय होतं. खूपच निसर्गसौंदर्य आणि चमत्कार पाहायला मिळाले. पण हे केवळ एकदा पाहण्यासारखे नव्हते. जूस्ट आणि अॅनेक किस्ट्रिक्सव्हेनच्या प्रवासावर पुन्हा पुन्हा का जातात? हे मला समजलं होतं. कारण इथं एकदाच जाणं पुरेसं नाही. 
 
Published By- Priya Dixit