शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रपती निवडणूक
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (13:24 IST)

द्रौपदी मुर्मू वि. यशवंत सिन्हा: राष्ट्रपतिपदासाठी मतदान सुरू, एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क

देशाच्या 16व्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. तसेच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महागाई, अग्निपथ योजना यावरुन विरोधक सरकारला घेरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रकृती ठीक नसल्याने मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं.
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. मूर्म राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या असतील. 25 तारखेला राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 4809 लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार आणि 4033 विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.
 
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल.
 
एकूण 4809 लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे 10 लाख, 86 हजार, 431 एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील 776 खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे 700 एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे 5 लाख, 43 हजार, 200 आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे 5 लाख, 43 हजार, 231 एवढे आहे.
 
मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
 
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदान केलं. 200 पेक्षा जास्त आमदार अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करतील असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
 
दरम्यान, काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मतदानावर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्षेप घेतल्यचे समजते.
 
 
 
कोणाचं आव्हान तगडं?
2022 मध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुका 16 व्या निवडणुका असतील.
 
यंदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजमध्ये 4809 सदस्य असतील. यामध्ये राज्यसभेचे 233, लोकसभेचे 543 आणि विधानसभेचे 4033 सदस्य असतील.
 
मतदानादरम्यान प्रत्येक खासदार आणि विधानसभेच्या सदस्याच्या मतांच मूल्य असतं.
 
यावेळी एका खासदाराच्या मताचं मूल्य 700 एवढं निश्चित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आमदाराच्या मतांचं मूल्य हे त्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे.
 
उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या प्रत्येक सदस्याच्या मताचं मूल्य हे 208 असेल, तर मिझोराममध्ये ते मूल्य 8 आणि तामिळनाडूमध्ये 176 एवढं असेल. विधानसभेच्या सदस्यांच्या मतांचं एकूण मूल्य 5,43, 231 इतकं असेल.
 
संसदेच्या एकूण सदस्यांच्या मतांच मूल्य 543,200 इतकं असेल. म्हणजेच इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांच्या मतांच मूल्य 10,86,431 इतकं असेल.
 
10.86 लाख मतमूल्य असलेल्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना 50 टक्क्यांपेक्षा कमी मते आहेत. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी सारख्या पक्षांची मदत लागेलं.
 
भारतातील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील काही ठळक मुद्दे
29 जूनपर्यंत नामांकन अर्ज भरणे, 18 जुलै रोजी मतदान आणि 21 जुलै रोजी निकाल
 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 10,80,131 मतांची गोळाबेरीज असेल. ज्या उमेदवाराला 5, 40, 065 पेक्षा जास्त मतमूल्य मिळेल, तो उमेदवार विजयी होईल.
 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 767 खासदार (540 लोकसभा, 227 राज्यसभा) आणि एकूण 4033 आमदार मतदान करतील. प्रत्येकी एका खासदाराच्या मताचं मूल्य 700 इतकं आहे. म्हणजेच एकूण मतांचं मूल्य 3,13,600 आहे.
 
राज्याची लोकसंख्या आणि एकूण आमदारांच्या संख्येवरून आमदारांच्या मतांचं मूल्य ठरवलं जातं.
 
यूपीमध्ये 208 तर सिक्कीममध्ये फक्त 7 आमदार आहेत.
 
एकूण 4033 आमदारांचं मतमूल्य 5,43,231 इतकं आहे. अशा प्रकारे निवडणुकीसाठी एकूण मतमूल्य 10,80,131 इतकं असतं.
 
या निवडणुकीत जिंकण्यासाठी 50% म्हणजेच 5,40,065 पेक्षा जास्त मत आवश्यक आहेत.