बाप्परे, पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमधून थेट 33 वर्षीय युवती बेपत्ता, आईचे उपोषण
पुण्यातील शिवाजीनगरमधील जंबो कोव्हिड सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 27 दिवसांपासून कोव्हिड सेंटरमधून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीची आई उपोषणाला बसली आहे. नेहमीप्रमाणे रूग्णालय प्रशासन मात्र हात झटकून मोकळे झाले आहे.
“आमची मुलगी 29 ऑगस्ट रोजी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी भरती झाली होती. 30 तारखेला आम्ही काळजीपोटी रूग्णालयात आलो तर 49 नंबर बेडवर उपचार सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ती बरी झाल्यानंतर आणि तिचा क्वारन्टाईन पिरीयड संपल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं गेलं. 13सप्टेंबरला आम्ही रूग्णालयात गेलो असतो तिला उद्या डिस्चार्ज देणार आहोत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ती आणखीही आमच्या नजरेस पडलेली नाही”, अशा संतप्त भावना मुलीच्या आईने व्यक्त केल्या.
“आमची मुलगी नेमकी आहे कुठे?”, असा आर्त सवाल मुलीचे कुटुंबीय प्रशासनाला वारंवार विचारत आहेत. प्रशासन काही उत्तर देत नसून मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केलीये.