गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (16:09 IST)

अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल,जाणून घ्या प्रकरण

A case has been registered against actress Payal Rohatgi in Pune Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे वादग्रस्त ठरलेल्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबद्दल आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी  यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परिवारायांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे.संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती.सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.
 
पायल रोहतगी हिने नेहमीच वादग्रस्त पोस्ट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे.पायल हिने दिग्दर्शक दिबाकर बनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.यापूर्वी ट्विटरने खोट्या व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने पायल हिचे अकाऊंट अनेक वेळा बंद केले आहे. हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरणात सांप्रदायिक ट्विट केल्याने तिच्यावर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली होती.मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलने रोहतगी ला २०१९ मध्ये ब्लॉक केले होते.
 
जून २०१९ मध्ये पायल रोहतगी हिने शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक टिप्पणी केली होती.त्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार करुन तिच्या अटकेची मागणी केली होती.त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित केला होता.
 
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे वैध मुले नाहीत असा व्हिडिओ तिने ऑक्टोंबर २०१९ मध्ये फेसबुकवर टाकला होता. त्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर तिने प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांची जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर पुन्हा १५ डिसेंबर रोजी तिने नेहरु गांधी परिवारावर टिप्पणी केली होती. यावरुन अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती.न्यायालयाने तिला दुसर्‍या दिवशी जामिनावर सोडले होते. त्यानंतर जुलै २०२०मध्ये ट्विटरने तिचे अकाऊंट पुन्हा एकदा निलंबित केले होते. त्यानंतर आता पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.