गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (11:12 IST)

पुण्यात शनिवारी ‘एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती’

पुण्यात शनिवारी (१२ डिसेंबर) ‘एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अनावश्यक हॉर्न वाजविण्याच्या वृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी सदरचा उपक्रम राबविला जाणार आहे. 
 
पुण्यात साधारणत: दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजविला जातो व यातील ९० टक्के वेळा हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांश पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे ‘नो हॉर्न’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागातर्फे एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी  दिली. 
 
शनिवारी दुपारी बारा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात टिळक चौक येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले, डॉ.राजेश देशपांडे, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे उपस्थित राहणार आहेत.
 
 वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्नचा आवाज प्रमुख कारण आहे. त्यामुळे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.