सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (08:09 IST)

८ डिसेंबरच्या देशव्यापी संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून, त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
 
बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी व्यापार करतात, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, तसेच माथाडी कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्भे येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांतील कामकाज मंगळवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी आणि इतक संबंधित घटकांनी मंगळवारच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.