1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:03 IST)

योगी आदित्यनाथ यांचा खोचक प्रश्न, म्हणे त्यामुळे तुम्ही का इतके चिंतित झाला आहात

Yogi Adityanath
मुंबईतील बॉलीवूड इथेच राहणार आहे. आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची नवी फिल्म सिटी उभारत आहोत. त्यामुळे तुम्ही का इतके चिंतित झाला आहात, असा खोचक प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केला.
 
आदित्यनाथ म्हणाले, कोणीही काहीही घेऊन जायला आलेले नाही. कोणीही न्यायला ती काही कुणाची पर्स नाही. जिथे सुरक्षित वातावरण मिळेल, सामाजिक सुरक्षा असेल, भेदभाव नसेल तिथे लोक जातील. काळानुरूप सुविधा आणि वातावरण उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीमध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच संदर्भात सिनेजगतातील दिग्गजांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आम्हाला कोणाची गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्या विकासात बाधा निर्माण करायची नाही. देशाच्या आर्थिक विकासात आम्ही आमचे योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. विकासासाठी, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नेतृत्वाची नीती साफ असायला हवी. सरकारबद्दल विश्वास हवा, सरकार स्थिर असणेही महत्त्वाचे आहे. या बाबी असतील तर आपोआप गुंतवणूकदार तुमच्याकडे आकर्षित होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.