मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (20:40 IST)

कोरोना महाराष्ट्र : 'या' विचाराने त्यांनी केले शंभराहून अधिक कोरोना बळींवर अंत्यसंस्कार

राहुल गायकवाड
''काही नातेवाईक रुग्णालयात सही करायचे आणि घरी निघून जायचे, तर काही स्मशानभूमीच्या गेटवरच थांबायचे. आम्हीच मग कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी करायचो आणि अस्थी नातेवाईकांना द्यायचो,'' पुणे जिल्ह्यातील मंचर गावचे माजी सरपंच दत्ता गांजाळे सांगत होते.
 
गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांचे सहकारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे काम करत आहेत.
 
हे काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांपैकी केवळ एकालाच कोरोनाची लागण झाली मात्र तोही औषधोपचाराने बरा होऊन पुन्हा या कामाला लागलाय.
 
कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार स्थानिक प्रशासनाने करायचे असा आदेश पहिल्या लाटेदरम्यान सरकारने काढला होता. मंचरमध्ये गेल्या वर्षी गावातील दोन कोरोनाबाधितांचा एकाच दिवशी मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांवर कशाप्रकारे अंत्यसंस्कार करायचे याबाबत संभ्रम असल्याने त्यावेळी गांजाळे यांनीच दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. त्यांनंतर हे कार्य पुढे चालू राहिले.
 
घरच्यांना यापासून संसर्ग होऊ नये म्हणून गांजळे हे गेल्या वर्षी काही महिने ग्रामपंचायत कार्यालयात राहिले होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ते घरी परतले. दुसऱ्या लाटेत देखील ते घरच्यांपासून लांब राहून हे कार्य करत आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना गांजाळे म्हणाले, ''पहिल्या लाटेत जेव्हा गावात पहिल्यांदा दोन जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले तेव्हा त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. त्यावेळी गावाचे पालक या नात्याने आम्हीच त्यांचे अंत्यविधी केले.
 
''ज्यांची जवळची व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली असते असे लोक गोंधळलेले असतात त्यामुळे त्यांना आधार देण्याची गरज असते. अनेक नातेवाईक मृतदेहाच्या जवळ जायला घाबरतात अशावेळी आम्हीच कोरोनाच्या रुग्णांचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. काही झालं तरी मानवता राहिली पाहिजे या विचाराने आम्ही काम करत आहोत.''
मंचरमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. तेथील बेड्सची संख्या देखील कमी आहे. अशावेळी कोणी कोरोनाने मृत्युमुखी पडल्यास तेथील इतर रुग्ण घाबरून जात असत. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावे, असं गांजाळे यांना सांगितलं जातं.
 
मंचर तालुक्यातील काही भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना सावडण्याच्या विधीला (अस्थिविसर्जन) सुद्धा येणे शक्य होत नसे, तर काहींचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित होत असे. अशावेळी सावडण्याचे काम सुद्धा दत्ता आणि त्यांचे सहकारी करतात.
केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम आणि लिंगायत समाजाच्या रुग्णांवर देखील त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
 
"कोरोनाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर घाबरलेला असतो. त्याला आधाराची गरज असते. त्यामुळे अशा रुग्णाला धीर देण्यासाठी त्याला फोन करुन त्याची विचारपूस जरी केली तरी तो त्याच्यासाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाची नियमित विचारपूस करायला हवी," गांजाळे सांगतात.