रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (23:19 IST)

झोपडपट्टीत वर्चस्ववादातून गुन्हेगारांच्या दोन टोळ्यात थरार

खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत झोपडपट्टीत कुणाचे वर्चस्व राहणार या वादातून गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये एकमेकांवर जीवघेणा हल्ला झाला. खडकी बाजार परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गुन्हेगाराच्या दोन डोळ्यातील सदस्यांनी एकमेकांवर खुनी हल्ला केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
 
प्रतिक राहूल लोंढे (वय 19, रा. कदमचाळ, खडकी बाजार) याला अटक केली आहे. तर, शुभम आगलावे, सलमान शेख व त्यांचे इतर तीन साथीदार पसार आहेत. याबाबत साहिल ऊर्फ भिंगरी समीर खान (वय 19) याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मोहरम निमित्त टाकण्यात आलेल्या एका मंडपात फिर्यादी बसला होता. यावेळी आरोपी त्याठिकाणी दुचाकीवरून आले आणि आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस, असे विचारणा करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत. आमची खडकी भागात दहशत आहे, असे म्हणत फिर्यादीला घेराव घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 
या घटनेने खडकी बाजार परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या खडकी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तरी इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तक्रारदार साहिल याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यात पुर्वीपासून वाद आहेत. डिसेंबर 202 मध्ये फिर्यादीवर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.