तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यात मोठा परिणाम
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा पुणे शहर व जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून आला आहे. पुणे शहरात वेगवान वाऱ्यामुळे ४० झाडे पडली. बारामती येथे महावितरणाचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. तर खेड तालुक्यात ८७ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीत पार्क केलेल्या मोटारीवर झाड कोसळून मोटारीचे नुकसान झाले. पुणे शहरात शनिवारी रात्री जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती. ताशी ५० ते ५५ किमी वेगाने वारे वाहू लागले, तसे झाडे उन्मळून पडण्याचा वेगही वाढला. शिवाजीनगर येथे ४.१ मिमी, पाषाण येथे ३.८ मिमी. तर लोहगाव येथे ९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
शहरातील जवळपास सर्व भागात झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात प्रामुख्याने मुकुंदनगर, येरवडा, हडपसर, धनकवडी, कल्याणीनगर, कात्रज, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, सोलापूर बाजार, विश्रांतवाडी, सिहंगड रोड, नवी पेठ, कोरेगाव पार्क, गंज पेठ, सारसबाग, टिंगरेनगर या भागात झाडपडीच्या घटना घडल्या.