केसरीचे विश्वस्त संपादक लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक यांचे दु:खद निधन
केसरी दैनिकाचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक यांचे वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवार 16 जुलै रोजी पहाटे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी 8 ते 11 पर्यंत टिळकवड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवणार असून दुपारी 12 वाजे नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र काँग्रेसचे नेते रोहित टिळक, कन्या , नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. दीपक टिळक हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्व. जयंत टिळक यांचे सुपुत्र होते. त्यांच्या मातोश्री स्व. इंदुताई टिळक या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालपणापासून सामाजिक वातावरणात वाढलेल्या दीपक यांनी समाजहितासाठी केल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
टिळक घराण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या एका कार्यकर्त्याचे शांत, मितभाषी पण प्रगल्भ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पुणे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात ते सन्माननीय होते.
त्यांनी केसरी या ऐतिहासिक दैनिकाचे संपादकपद अनेक वर्षे भूषवले. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचेही काही काळ कुलगुरूपद त्यांनी सांभाळले.2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते.
Edited By - Priya Dixit