मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (16:44 IST)

डी.एस.के यांचा जामीन अर्ज फेटाळला, पत्नी हेमंती यांना जामीन मंजूर

ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये वकील आशुतोष श्रीवास्तवा यांनी कुलकर्णी यांची बाजू मांडली. २०१८ पासून कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आहे.आजच्या निर्णयानंतर हेमंती यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होणार आहे. मात्र याचवेळी न्यायालयाने डी.एस.के यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. शुक्रवारी या प्रकरणामध्ये न्या.डी.पी. नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती.त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता हेमंती यांना जामीन मिळाला असला तरी डी. एस. के यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती श्रीवास्तवा यांनी दिली.
 
ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद,पुतणी,जावई यांना अटक करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी २०१८ पासून दीपक कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाने मध्यंतरी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज जून महिन्यामध्ये विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. २०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.