शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (08:15 IST)

वयाच्या ७९ व्या वर्षी कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी पायी चालत शिवनेरी किल्ली सर केला आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले.
 
शिवनेरी गडावर भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी जिजाउ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. याचसोबत गडावरील इतर ऐतिहासिक गोष्टीही राज्यपालांनी मन लावून पाहिल्या. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेसमोर कोश्यारी लीन होऊन नतमस्तक झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते गडावरील शिवाई देवीची आरती करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पुजा आणि प्रतिमेचं पुजन करून राज्यपालांच्या हस्ते खास वृक्षारोपण करण्यात आलं.
 
राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधीकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, आमदार अतुल बेनके व इतर अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान राज्यपालांनी गडावरील विविध प्रकारच्या वनस्पतींची नाव विचारुन प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस दाखवला. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या प्रत्येक गड-किल्ल्याचं संवर्धन हे व्हायलाच हवं. यासाठी प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला संवंर्धनासाठी द्यायला हवा असंही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.