Modi's visit to Puneमोदींच्या पुणे दौऱ्यात इंडिया फ्रंट-एनडीए आमनेसामने
Modi's visit to Pune पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने एनडीए व इंडिया आघाडी दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होत असून, लोकमान्य टिळक पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मात्र, मणिपूरच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांविरोधात इंडिया आघाडीकडून निदर्शन केली जाणार आहे. इंडिया फ्रंटच्या वतीने मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंडईतील हुतात्मा बाबू गेनू चौक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याचे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, रिपब्लिकन, डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटनांचा समावेश असेल. तर भाजपा प्रतिआंदोलन करणार असून, दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.