रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (08:28 IST)

पत्नी, मुलीची हत्या करून आयटी अभियंत्याची आत्महत्या

suicide
पुणे  : अज्ञात कारणातून राहत्या घरात पत्नीचा व आठ वर्षांच्या मुलीचा खून केल्यानंतर आयटी अभियंत्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबजनक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. प्रियंका सुदिप्ता गांगुली (वय 40), मुलगा तनिष्क गांगुली (8) असे खून झालेल्या मायलेकींचे नाव आहे. तर आरोपी सुदिप्ता गांगुली (44) याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
गांगुली कुटुंबीय मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. मागील 17 ते 18 वर्षांपासून कामानिमित्त ते पुण्यात वास्तव्यास आहे. हिंजवडी परिसरातील नामांकित टीसीएस कंपनीत सुदिप्ता हा आयटी अभियंता चांगल्या पगाराची नोकरी करत होता. तर त्याची पत्नी गृहिणी होती. नेमके कोणत्या कारणास्तव आरोपीने हे कृत्य केले, याचा अद्याप उलगडा झालेला नसून, याबाबत पोलीस तपास करत असल्याची माहिती चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण यांनी दिली आहे.
 
बेपत्ता झाल्याची तक्रार होती दाखल
सुदिप्ता गांगुली याचा भाऊ बेंगळूर याठिकाणी कामास असून मंगळवारी संध्याकाळी तो भावाला फोन करत होता. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने एका मित्राला भावाच्या घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार सदर मित्र घरी गेला असता, त्यास घराचा दरवाजा बंद दिसून आल्याने तो पुन्हा घरी परतला. परंतु त्यास याबाबत भावाची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल कर, असे सांगितल्याने त्याने याबाबत चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मिसिंग व्यक्तीचे लोकेशन तपासले असता, ते घरातच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्यावर एका खोलीत सुदिप्ता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर दुसऱ्या खोलीत बेडवर पत्नी व मुलाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाला.