गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:11 IST)

पुण्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस, 8 जण अटकेत

leopard-skin
वन विभागाने मोठी कारवाई केली असून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डुक्कर खिंडीत सापळा रचून आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.
 
अनिकेत प्रमोद भोईटे (वय 20), संदिप शंकर लकडे (वय 34, रा. फलटण), धनाजी नारायण काळे (वय 35, रा. औरंगाबाद), आदेश शरदराव इंगोले (वय 47, रा. बारामती), बाळू बापू नामदा (वय 65, रा. कराड), आकाश आण्णासाहेब रायते (वय 27, रा. इंदापूर), उदयसिंह शंकरराव सावंत (वय 47), अमोल रमेश वेदपाठक (वय 34) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानंतर वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून या तस्करांशी संपर्क साधला होता आणि हे कातडी विकत घेण्यासाठी त्यांना वारजे परिसरात बोलावले होते.
 
दरम्यान आरोपींनी दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते देत हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी वारजे तिला डुक्कर खिंड परिसरात आरोपी बिबट्याचे कातडे घेऊन आले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत बिबट्याचा कातडीचा व्यवहार सासवड येथे होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सासवड येथे सापळा रचून इतर आरोपींना आज अटक केली आहे. आता त्यांच्याकडे बिबट्याची शिकार कोणी व कोठे केली. तसेच, इतर कोणी आरोपी आहेत का, तर त्याच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे.