‘माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत!’- सुप्रिया सुळे
पुणे : माझ्या दादाला संघटनेत काम करण्याची संधी द्यायची की नाही, याचा निर्णय संघटनात्मक पातळीवरचे नेते घेतील. पण माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत, अशीच माझीही इच्छा असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिली. विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मला संघटनेमध्ये काम करू द्यावे, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली. त्याचे राजकीय स्तरावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या संदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझ्या भावाच्या इच्छा पूर्ण होवोत, अशीच माझीही इच्छा आहे, असे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही, हा संघटनात्मक पातळीवरील निर्णय आहे. मला मनापासून आनंद आहे, की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचे की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. पण माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहीण म्हणून माझी इच्छा आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor