सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (21:43 IST)

अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे वाचा सविस्तर

supriya sule
अजित पवार हे एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.
 
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर सुप्रिया सुळे आज प्रथमच मुंबईत आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली. यावेळी बोलतांना अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
दीपक केसरकरांनी अजित पवार यांना दिलेल्या खुल्या ऑफरबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
 
त्याचबरोबर अजित पवार यांच्याबद्दल मला अतिश आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, असंही केसरकर म्हणाले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor