रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2026 (13:11 IST)

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावले

maharashtra kesari 2026 pune wagholi, harshvardhan sadgir, nashik
social media
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुण्यात पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (२०२६) महेंद्र गायकवाडचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे  हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा मानाची चांदीची गदा जिंकून 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला आहे या स्पर्धेचे आयोजन पुण्यात वाघोली येथे करण्यात आले होते.
रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा समारोप सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती पार पडला.
 
६८ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने, तर गादी विभागात नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने दिमाखदार विजय नोंदवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
अंतिम फेरीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकातील हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. हे दोघे  कुस्तीवीर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झाले असून एकाच आखाड्यात सराव करतात.
माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर ३-० अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासूनच अटीतटीचीलढत काळजाचा ठोका चुकवणारी ठरली.
 
गादी विभागातील अंतिम फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 
 
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीला सुरुवात होताच महेंद्रने आक्रमक खेळाला सुरवात केली. त्यामध्ये महेंद्र याला 1 गुण देण्यात आला. हर्षवर्धन याने शांत आणि संयमी खेळ करत महेंद्र याचे आक्रमण थोपवत होता. महेंद्र याने धोबीची पकड करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन याने धुडकावून लावली. हर्षवर्धन याने हप्ते डावाची पकड केली पण गुण मिळवता आला नाही. पहिल्या फेरीत दोघांनी 1-1 अशी बरोबरी गाठली.
 
दुसऱ्या फेरीत महेंद्र याने पटाला लागण्याचा प्रयत्न केला पण गुण मिळवता आला नाही. महेंद्र याला निष्क्रियता असल्याचे सांगत 1 गुण हर्षवर्धन याला देण्यात आला. त्यानंतर हर्षवर्धन याने पटाला लागत 2 गुण मिळवला. आणि हर्षवर्धन याने महेंद्र याचा 4-3 असा पराभव करीत डबल महाराष्ट्र केसरीचा ‘किताब पटकावला.
 
शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “लहानपणापासून मुलांमध्ये खेळाची आवड आणि संस्कार रुजावेत यासाठी विशेष क्रीडा शाळा सुरू करण्यात येणार आहेत.” त्यांनी आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक केले.
या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, कुस्ती पंच प्रमुख दिनेश गुंड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
 
या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा समारोप सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. अंतिम दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील, आमदार विजय बापू शिवतारे, आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार राहुलदादा कुल, शहराध्यक्ष नाना भानगिरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर रवि लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, छत्रपती संभाजीराजे भोसले, मंत्री दादा भुसे, अभिनेते जॅकी श्रॉफ, पीसीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
 
Edited By - Priya Dixit