मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (07:45 IST)

दोन आठवड्यात साकारला ‘ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट’

‘रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता पुणे महापालिकेने अवघ्या दोन आठवड्यात ‘ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट’ दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे. प्रस्ताव ते प्रत्यक्ष ऑक्सिजननिर्मिती अवघ्या 15 दिवसात शक्य केले आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
दळवी हॉस्पिटलमध्ये साकारलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
 
महापौर पुढे बोलताना म्हणाले, ‘ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 130 ऑक्सिजन बेड्स आहेत. सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये 2200 किलो प्रती दिन (12 ते 15 यूरा सिलिन्डर्स) प्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झालेली होती, म्हणूनच आपण अवघ्या दोन आठवड्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.
 
‘दळवी हॉस्पिटलमध्ये प्रती बेड 10 लिटर प्रती मिनिटनुसार सुमारे 1700 लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टची आवश्यक होती. म्हणूनच आपण 859 लिटर/मिनिटप्रमाणे दोन ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट्स बसविणे. तसेच बॅकपसाठी एक अतिरिक्त कॉम्प्रेसर, सिस्टीमपर्यंतचे पाईपिंग, विद्युत विषयक कामे या सर्व बाबी करुन घेतल्या आहेत. यामध्ये 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून सदर कंपनीने कमीतकमी 3 महिने प्रकल्प चालवणार आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
 
महापालिका 7 ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट’ उभारणार : महापौर
पुणे मनपा हद्दीत आपण आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करत आहोत. त्यासाठी विविध टप्पेदेखील आखलेले आहेत. प्रत्यक्ष रुग्णालयात साकारणे, वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करणे, अधिकाधिक बेड्स तयार करणे, याकडे आपला कल असून यात निधी कमी पडू देणार नाही. शहरात एकूण 7 ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट साकारत असून दळवी हॉस्पिटलसह नायडू, नवीन आणि जुने बाणेर हॉस्पिटल येथे हे प्रकल्प उभारत आहोत, असेही यावेळी महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.