अभिमानास्पद, पुण्याच्या महिलेला जेएनयुच्या पहिला महिला कुलगुरु होण्याचा मान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुपदी निवड झाली आहे. शांतीश्री पंडित यांनी जेएनयुच्या पहिला महिला कुलगुरु होण्याचा मान मिळवला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून प्राध्यापक शांतीश्री पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांनी पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. मागील 29 वर्षापासून त्या पुणे विद्यापीठात आहेत.
प्राध्यापक शांतीश्री पंडित यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल आणि भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल वर्कमध्ये डिप्लोमाही केला आहे. तसेच मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्र आणि एमए राज्यशास्त्रात बी.ए. पूर्ण केले आहे.