आधी शाईफेक, आता अटक! जाणून घ्या कोणत्या एका चुकीमुळे राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रवक्ते आणि नेते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात 'घुसखोरी' झाली असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर, त्यांनी कथित घुसखोरी केलेल्या वारकऱ्यांची एक यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. त्यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदाय आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी येरवड्यातील नलिनी आशिष वायाळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लवांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या वादातूनच ९ मे रोजी लोणी काळभोर परिसरात लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती, तसेच त्यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह १४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयात काय घडले आणि जामीन का रद्द झाला?
अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी विकास लवांडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. लवांडे यांनी आपल्या जामीन अर्जात स्वतःविरोधातील जुने चार गुन्हे लपवून ठेवल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. माहिती लपवल्याचा हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने लवांडे यांचे अंतरिम संरक्षण (जामीन) रद्द केले. त्यानंतर काही तासांतच वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
— Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2026
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या… pic.twitter.com/mfODGUBIlb
राजकीय वातावरण तापले; विकास लवांडे संतप्त
लवांडे यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाला असून ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप पक्षाकडून केला जात आहे. कार्यकर्त्यांना वाघोली पोलीस ठाण्याबाहेर जमा होण्याचे आवाहन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे आपल्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना विकास लवांडे म्हणाले, "माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलीस मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय आणि पूर्वसूचना न देता पोलीस रात्रीच्या वेळी माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मी कायद्याचा आदर करणारा माणूस असून फरार नव्हतो, पोलिसांनी फोन केला असता तरी मी स्वतःहून सहकार्य केले असते."

