1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Pune SSC Paper Leak 10th Math exam paper leak

10th Math exam paper leak पुण्यात दहावीचा पेपर फुटला!, शिक्षण मंडळाकडून चौकशीचे आदेश

Pune SSC Paper Leak
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC) सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गणिताचे दोन्ही महत्त्वाचे पेपर चक्क परीक्षा होण्यापूर्वीच एका 'टेलिग्राम' (Telegram) ग्रुपवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
नेमका प्रकार काय?
पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी मंडळाच्या अधिकाऱ्यांना एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली होती. या ग्रुपची सखोल तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले:
गणित भाग-१: ६ मार्च रोजी होणारा हा पेपर ५ मार्चला रात्री ८:३७ वाजताच ग्रुपवर टाकण्यात आला होता. 
गणित भाग-२: ९ मार्च रोजी झालेला हा पेपर तर तब्बल तीन दिवस आधीच, म्हणजेच ६ मार्चला दुपारी ४:५६ वाजता ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.
 
तपासणीत काय आढळले?
शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मंडळाच्या अधिकृत प्रश्नपत्रिका यांची पडताळणी केली. या तपासणीत दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत सारख्याच असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे धोक्यात आली असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
 
पुढील कारवाई:
या गंभीर प्रकारामुळे राज्य शिक्षण मंडळाने तातडीने पावले उचलत पोलिसांत तक्रार दिली आहे. हा पेपर नेमका कोणत्या केंद्रावरून किंवा कुठून लीक झाला, याचे मूळ शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या रॅकेटमध्ये कोणी मोठे अधिकारी किंवा कोचिंग क्लासेसचे चालक सहभागी आहेत का, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
पुढील लेख
LIVE: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये उघडतील