1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (22:51 IST)

पुणे : 'वेताळ' टेकडीवरील रस्त्याला पुणेकरांचा विरोध कशामुळे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

himachal
पुणे शहराच्या पश्चिम भागात असलेली वेताळ टेकडी सध्या चर्चेचा मुद्दा ठरली आहे.
झाडे, जैववैविधता आणि वेगवेगळ्या प्रजातींनी नटलेल्या वेताळ टेकडीला अभ्यासक ‘मिनी सह्याद्री’ अशी उपमाही देतात.पर्यावरणप्रेमींच्या जिव्हाळ्याच्या या टेकडीला आता धोका निर्माण होतो की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
 
प्रस्तावित बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि कोथरुड, पाषाण आणि सेनापती बापट रोड यांना जोडणारे दोन बोगदे या प्रकरणात वादाचं कारण ठरले आहेत.
 
त्याचसोबत बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरुन सध्या पुणे शहरातील राजकीय वातावरणही तापलेलं पाहायला मिळतंय.
 
हा नेमका प्रकल्प काय आहे आणि त्याला का विरोध होतोय हे जाणून घेऊया.
 
पुण्यातील वेताळ टेकडी
पुण्यातील डॉ. सतीश फडके यांनी मागच्या वर्षी ‘फ्लोरा आफ वेताळ टेकडी’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.
 
पुणे शहराच्या हिरवाई आणि भौगोलिक रचनेमध्ये भर घालणाऱ्या वेताळ टेकडीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या जातींच्या त्यांनी नोंदी केल्या आहेत.
 
या पुस्तकात वेताळ टेकडीवरच्या जवळपास 250 फुलांच्या झाडांची माहिती त्यांनी दिलेली आहे. यावरून वेताळ टेकडीवरच्या जैववैविधतेची कल्पना येते.
 
वेताळ टेकडीवर वेताळ बाबाचं मंदिर आहे. त्यावरुन या टेकडीला हे नाव पडलं असावं असा अंदाज बांधला जातो.
 
वेताळ टेकडीचा विस्तार मोठा आहे आणि त्याच्या पायथ्याशी अनेक नामवंत शैक्षणिक आणि संशोधन संस्था वसलेल्या आहेत. कोथरुड ते सेनापती बापट रस्त्याच्या दरम्यान समांतर वेताळ टेकडी आहे.
 
वेताळ टेकडीवर चढण्यासाठी अनेक पर्यायी रस्त्यांचा वापर केला जातो. कोथरूड भागातून केळेवाडीमधून टेकडीवर चढता येते. तर लॉ कॉलेज रोड, सेनापती बापड रोड आणि पत्रकार नगर मधूनही टेकडीवर जाता येतं.
 
पण वेताळ टेकडीच्या अवती भोवती झपाट्याने शहरीकरण झालं आहे. त्याच सोबत टेकडीच्या पायथ्याशी रस्ता बांधण्याचा प्रकल्पाची चर्चा सुरु आहे.
 
बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रकल्प
लॉ कॉलेज रोडवरची वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी या रस्त्याची आखणी असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय.
 
सध्या जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार पुणे पालिकेने साधारणपणे 253 कोटींचा सेनापती बापट रोडवरील बालभारती ऑफिस ते पौड फाटा जवळच्या केळेवाडी जंक्शन पर्यंतचा एक रस्ता बांधण्याचा घाट घातला आहे.
 
साधारणपणे 2.1 किलोमिटरचा हा रस्ता वेताळ टेकडीवरुन किंवा तिच्या पायथ्यावरुन जाईल.
 
या रस्त्याची रुंदी 30 मीटर प्रस्तावित आहे. प्रस्तावित रस्ता हा लॉ कॉलेज रोडला समांतर असून वेताळ टेकडीच्या पायथ्याने जाणार असल्याचं म्हटलेलं आहे.
 
6 लेनच्या या रस्ताला दोन्ही बाजूंनी फुटपाथ असतील असंही त्याच्या ड्राफ्टमध्ये म्हटलेलं आहे.
 
या रस्त्यामुळे लॉ कॉलेज रोडवरची ट्रॅफिकची समस्या कमी होईल असा पालिकेचा दावा आहे.
 
या रस्त्यासाठी पालिकेकडून लवकरच टेंडर काढलं जाईल अशी माहिती पुढे आलेली आहे.
 
37 वर्षं जुना प्रकल्प
बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा प्रस्ताव नवीन नाही आणि त्याला होणारा विरोधही नवीन नाहीये.
 
जुन्या नोंदींनुसार पालिकेडून 80च्या दशकात या रस्त्यासंदर्भातला प्रस्ताव मांडला गेला होता.
 
पण तेव्हाही वेताळ टेकडीवर प्रेम करणाऱ्या पुणेकर नागरिकांनी त्या प्रकल्पाला विरोध केला आणि त्याविरोधात कायदेशीर लढा सुरु ठेवला.
 
वेताळ टेकडी बचाव आंदोलनात सक्रिय असणाऱ्या सुषमा दाते यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली.
 
सुषमा दाते लिहीतात, “या लढ्याची सुरुवात 1982 साली झाली. लता श्रीखंडे, तारा वारियर, सुलभा ब्रह्मे या तीन महिलांच्या नेतृत्वाखाली सुजाण, जागरूक नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आणि 1987 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने हा रस्ता डीपीतून वगळला. पुण्यातील बहुतांश पर्यावरण चळवळीत महिला आघाडीवर राहिल्या आहेत."
 
"नगररचना उपसंचालकांनी 1994 मध्ये केलेल्या वाहतुकीच्या अभ्यासात 'यामुळे कोथरूडवासीयांना कोणताही ठोस दिलासा मिळणार नाही, पौड फाटा येथील परिस्थिती सुटणार नाही, असं समितीला वाटतं,’ असं म्हटलं होतं. असं असतानाही 1996 मध्ये महापालिकेने जीबी ठरावाद्वारे या रस्त्याला मंजुरी दिली.”
नागरिकांच्या विरोधामुळे या रस्त्याला मंजुरी मिळाली असतानाही काम लांबत गेलं. पण 2006 साली मात्र या रस्त्याच्या कामासाठी अर्थ मूव्हर आणले गेले. तेव्हा काही तरुणांनी पुढाकार घेऊन रात्रंदिवस वेताळ टेकडीवर पहारा दिल्याचंही सुषमा दाते यांनी म्हटलं आहे.
 
अर्थ मूव्हरच्या कामात झाडांच्या झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करुन काही जण सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टाने स्टे ऑर्डर दिली.
 
त्यानंतर मेजर जनरल (रिटायर्ड) सुधीर जठार यांनी हायकोर्टात पीआयएल केली. त्यानंतर 2016 साली हायकोर्टाने बांधकामावर स्टे दिला आणि त्यात सांगितलं की, हा रस्ता जनतेच्या हितासाठी आहे याची खात्री करुनच मग पालिकेने विकास आराखड्यात या रस्त्याचा समावेश करावा. कोर्टाने तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. यानुसार पालिकेने समितीची स्थापना केली.
 
या रस्त्याच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यासाठी पालिकेकडून कंसल्टंट नेमण्यात आले. त्यांचे अहवाल रस्त्याच्या बाजूने आल्यानंतर बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या बांधकामाची पुर्वतयारी सुरु झाली.
 
या दरम्यान पालिककडून जी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती, त्यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत दोन तज्ज्ञ नागरिकांचाही समावेश होता. त्यांनी या रस्त्याच्या उपयुक्ततेविषयी प्रश्न उपस्थित केले. पण या प्रक्रियेत त्यांना दूर सारल्याचा आरोपही करण्यात आला.
 
बालभारती – पौड फाटा रस्त्यावरचे आक्षेप
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा लॉ कॉलेज रोडवरची ट्रॅफिकची कोंडी दूर करणं हा जरी सांगितला जात असला तरीही या उद्देश कितपत सफल होईल यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
हाय कोर्टाने गठित केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी महापालिका आयुक्तांना एक इमेल लिहून याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचसोबत या प्रकल्पासाठीची टेंडर प्रोसेस होल्डवर ठेवण्याची विनंतीही त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली आहे.
 
प्रशांत इनामदार त्यांच्या इमेलमध्ये लिहीतात की, ‘सेनापची बापट रोडवरुन मोठ्या प्रमाणाच ट्रॅफिक लॉ कॉलेज रोडवर येतं आणि त्यानंतर नळ स्टॉपवरुन ते पौड रोडकडे वळतं असा एकमेव समज करुन बालभारती ते पौड फाटा रस्त्याची आखणी केल्याचं दिसतं. हे ट्रॅफिक बालभारती रोडवर शिफ्ट होईल असा तुमचा अंदाज आहे. पण वास्तव हे आहे की, असं नाहीये. वाहतुकीसंदर्भात 2010 आणि 2020 मध्ये जे सर्वेक्षण झालं त्यामध्ये लॉ कॉलेज रोडवरची किती वाहनं बालभारती रस्त्यावर शिफ्ट होतील याची आकडेवारीच दिलेली नाहीये. 2022 च्या डीपीआरमध्येही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे बालभारती रस्ता लॉ कॉलेज रोजडवरची वाहतूक कोडींचा प्रश्न सोडवेल हे सिद्ध करायला कोणताही डेटा उपलब्ध नाहीये.”
 
कंसल्टंट कंपन्यांच्या अहवालावर आंधळा विश्वास ठेऊन या प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचाही आरोप होतोय.
बालभारती रस्त्याच्या विरोधातला आणखी महत्त्वाचा मुद्दा हा रस्त्यामुळे टेकडीला आणि पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाचा उचलला जातोय.
 
“वेताळ टेकडी ही पुणेकरांचा श्वास आहे. यावर कित्येक झाडं आहेत. कितीतरी प्राणी आहेत. दररोज चालायला जाणारे, शारिरिक परिक्षांचा सराव करणारे अशा कित्येकांसाठी वेताळ टेकडी एक हक्काचं ठिकाण आहे."
 
"शहरातल्या अशा मोकळ्या जागा आधीच कमी होत आहेत. त्यात या रस्त्यामुळे वेताळ टेकडीचं नुकसान होईल. या रस्त्याचा डीपीआरचं सांगतो की, रस्त्यासाठी हजारो झाडे बाधित होतील. बांधकामासाठी येणारी अवजड वाहनं, साधनं यामुळे टेकडीरवरच्या परिसंस्थेला धोका उद्भवेल."
 
"तसंच रस्त्याच्या बांधकामामुळे टेकडीवर असलेले पाण्याचे स्रोतही नष्ट होतील. रस्ता टेकडीच्या पायथ्यापासून जरी जाणार असेल तरीही त्यासाठी टेकडीवर खोदकाम करावंचं लागेल आणि यामध्ये टेकडीचं अपिरिमित नुकसान होईल,” असं डेक्कन परिसर समितीच्या सुमिता काळे यांनी सांगितलं.
 
त्याचसोबत या रस्त्यामुळे ज्या भागांना जोडलं जाणार आहे तिथल्या ट्रॅफिकच्या परिस्थितीवर काय परिणाम होतील याचा अभ्यासही केला गेला नसल्याचा आरोप तज्ज्ञ समितीच्या सदस्यांकडून केला गेलाय.
 
बालभारती- पौड फाटा रस्त्यावरुन पुण्यात रंगलं राजकारण
एकीकडे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेतल्या. तर आता दुसरीकडे कोथरुडमधल्याच भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या रस्त्याला विरोधाची स्पष्ट भूमिका घेतली आहे.
 
मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात विविध नागरिक संघटनांनसोबत पुणे पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना पत्र लिहून या रस्त्याच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली आहे.
 
“खरोखरच आपल्याला बालभारती ते पौड फाटा रस्त्याची गरज आहे का? तो रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपयुक्त होणार आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. अनेक ट्रॅफिक रिपोर्टनुसार फक्त 12 ते 15 टक्के वाहतूक या रस्त्याचा वापर करेल."
 
"हा पूल जिथे उतरणार तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होईल. टेकडीवर बांधकाम करताना तीन हजार ते चार हजार मोठी झाडे काढली जातील. या सर्वातून फायदा कोणाला? नागरिकांना काहीच फायदा नाही,” असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
तर पुण्याचे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातला वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रकल्पांची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत या रस्त्याबाबत सगळ्यांची मतं ऐकून घेतले जातील असंही त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
 
"शहरातील वाहतूकीवरचा ताण पाहिला, शहराची लोकसंख्या, भौगोलिक विस्तार लक्षात घेतला तर, दिवसेंदिवस आपल्याला वाहतुकीची समस्या जाणवते आहे. पुढच्या काळातही ती जाणवत राहील. सर्वांगीण विचार करता शहरात अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प करणे गरजेचे आहे."
 
"उदा. नदीवरचे पुल, ग्रेड सेपरेटर्स, काही उड्डाणपुल, काही बालभारती- पौड फाटा रस्त्यासारखे प्रकल्पांचा विषय आहे. अशा अनेक प्रकल्पांचा विचार सकारात्मक केला पाहीजे. पण ते करत असताना एवढं नक्की आहे की सगळ्यांना सोबत घेऊन आपण हा विचार करतो आहे. पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, टेकडीचा विचार केला."
 
"यामध्ये लोकभावना काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, हे सुद्धा आपण ऐकून घेतोय. त्यामध्ये बैठका झाल्या. अजूनही होतील. यामध्ये असं काही नाही की लगेचंच बालभारती पौड फाटा रस्त्याविषयी लगेच निर्णय घ्यायला जातोय. पण यामध्ये अनेक पर्यायांचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल," मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
 
या रस्त्याच्या वादावर पालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. पण त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही. ते आल्यानंतर इथं अपडेट केलं जाईल.
Published By- Priya Dixit