पुणेकरांची वाहन ओळख बदलणार! MH-12 ची जागा आता MH-61 घेणार
काही गोष्टी एखाद्या शहराची ओळख बनवतात. त्यापैकी एक असते ती त्या शहराची वाहन नंबर प्लेट. ही त्या राज्याची आणि शहराची ओळख दाखवते. आता पुण्याची 37 वर्षाची ही ओळख बदलणार आहे. पुण्यातील वाहनांवरील MH-12 कोड आता बदलणार असून हा आता इतिहासात जमा होणार आहे. नवीन वाहनांवर यापुढे या कोडची नंबर प्लेट असणार नाही. त्याऐवजी MH-61 हा कोड वापरला जाईल.
पुणे आरटीओमधील सध्याचे अल्फान्यूमेरिक नोंदणी क्रमांक संपले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, MH-12 कोड अंतर्गत शेवटच्या ZZ मालिकेतील सर्व 9999 अंक या आठवड्यात संपले आहेत. यानंतर, आरटीओ नवीन MH-61 कोड अंतर्गत नोंदणी सुरू करण्याची तयारी करत आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, MH-61 कोड अंतर्गत नवीन वाहनांची नोंदणी सोमवारपासून सुरू झाली आहे. सध्या, राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) प्रणालीची काही बॅकएंड चाचणी सुरू आहे.
MH-12 झेडझेड ही वाहन नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता MH-61 बी ही मालिका पसंती क्रमांकासाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित क्रमांकाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुचाकीधारकांना नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांसाठी नोंदणी सुरू होण्यापूर्वी, फॅन्सी क्रमांकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वाहन मालकांना या विशेष क्रमांकांसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. फॅन्सी क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, नवीन MH-61 कोड अंतर्गत सामान्य वाहनांची नोंदणी सुरू होईल.
MH-61 बी मालिकेतील पसंती क्रमांकाची ( Pune RTO) प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने नियमित क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा सध्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नवीन नियमित मालिका सुरू झाल्यानंतरच वाहन खरेदी आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या परिवहन विभागाकडून चौस क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक सप्टेंबरपासून MH-61 मालिका नियमित वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit
