राज ठाकरेंची घोषणा-5 जूनला करणार अयोध्येचा दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून 2022 रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. पुणे इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांनी म्हटलं, "हा धार्मिक विषय आहे असं लोकांना वाटत आहे. पण मी आधीही सांगितलं आहे की हा सामाजिक विषय आहे. केवळ हिंदुंना त्रास होतोय असं नाही तर भोंग्यांचा त्रास मुस्लीम समुदायालाही होत आहे." असाही दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
"तसंच तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल आम्हीही दिवसातून पाचवेळा भोंग्यावर प्रार्थना लावणार. तसंच आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला हत्यार हातात घ्यायला लावू नका," असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.
"या देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा भोंगे महत्त्वाचे वाटत असतील तर जशाच तसे उत्तर देणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. महाराष्ट्रात आम्हाला दंगली नको आहेत. महाराष्ट्राची शांतता भंग करण्याची इच्छा आहे. माणुसकीच्या नात्याने मुस्लीम समाजाने याचा विचार करावा. प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही." असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईसंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "सगळ्या मशिदींवरील लाऊडस्पीकर अनधिकृत असून काढले जात नाहीत. शांतता भंग करत असतील तर त्यांना परमीट देऊ नका. त्यांच्यावर कारवाई होत नाही मग आमच्या मुलांवर कशी होते?"