ज्येष्ठ नेते मधुकर शेवाळे यांचे निधन
आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते मधुकर शेवाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शेवाळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. बी.ए चे शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ लष्करात काम केले. त्या नंतर त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत काम सुरु केले. गेली 30 वर्षे ते आठवले यांच्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर कार्यरत होते.
राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी चळवळीत कार्यकर्ते घडविण्याचे काम केले. रिपब्लिकनला एकत्र आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
चळवळींना सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले. त्यांना राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि दलितमित्र पुरस्काराने गौरवविण्यात आले. तसेच अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्यावर आज सकाळी 11 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून,चार मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.