1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (20:50 IST)

पुण्यातील मानाच्या 5 गणपती विसर्जनाचा पहिला मान कायम,कोर्टाचा निर्णय

court
पुणे शहरातील 5 मानाच्या गणपतींविरोधात न्यायालयात दाखल याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा पहिला मान कायम राहीला आहे. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींविरोधात बधई समाज ट्रस्टने याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली असून लक्ष्मी रोडवरून प्रथम 5 मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होण्याच्या प्रथेविरोधात आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
 
या याचिकेत अन्य याचिकाकर्ते नसल्याने याचा विस्तृत विचार करून सरसकट आदेश देता येणार नाही. मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला अमुक तास लागतील वगैरे मुद्देही गृहीत धरता येणार नाहीत, असे आदेश न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लद्धा यांच्या खंडपीठाने दिले.
 
मानाच्या गणेश मंडळांआधी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढायची असल्यास पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तांसह मानाच्या 5 गणेश मंडळांना प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे हा वाद निकाली निघाला आहे.