शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (08:14 IST)

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी तर अवकाळी पावसासह गारपिटही झाल्याचं पाहायला मिळालं.
 
येणाऱ्या दोन दिवसात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान विभागाने इशारा दिला आहे. काढणीला आलेल्या पिकांचं रक्षण करावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. पावसामुळे काढणीला आलेला शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पावसामुळे खराब झाला. शहरी भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
 
अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झाला तर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे हवामान विभागातर्फे शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी ताडपत्री अथवा प्लास्टिकचं आवरण काढणीला आलेल्या पिकांवर टाकावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत.