बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (08:03 IST)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे आमदार लक्ष्मण जगतापांनी केली ‘ही’ मागणी

महाराष्ट्रात  लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग व इतर आस्थापना गेल्या दोन महिन्यांचा जीएसटी भरू शकले नाहीत. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देऊन हा कर भरणाऱ्या सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे केली आहे.
 
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी निर्मला सितारमण यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे जीएसटी भरण्यास बांधील असलेले व्यापारी व इतर आस्थपना मुदतीत तो भरू शकले नाहीत. त्यांना जीएसटी भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.
 
जीएसटी कर भरणाऱ्या प्रत्येकाला कर भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता सुद्धा करता आलेले नाही. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे व्यापारी वर्ग व इतर आस्थापना गेल्या दोन महिन्यांपासून अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. आपण या समस्या समजून घेऊन अर्थमंत्रालयाने जीएसटी भरणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक करदात्याला एप्रिल आणि मे २०२१ या दोन महिन्यांचा जीएसटी भरण्यासाठी ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी. ही मुदतवाढ मिळाल्यास जीएसटी भरणाऱ्या सर्वांना खूप मोठा आधार मिळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.”