शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (08:39 IST)

D’mart च्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ मॅसेज फसवा, होऊ शकते आर्थिक फसवणूक

मागील काही दिवसांपासून D’mart च्या 20 व्या ॲनिवर्सरी बद्दल फ्री गिफ्ट चे आमिष दाखविणारा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यास चार प्रश्न विचारले जातात. पण, हा मेसेज फसवा असून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने याबाबत माहिती देणारं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

बनावट लिंकवर क्लिक केल्यास, एक वेबपेज उघडते त्यात चार प्रश्न विचारले जातात जसे कि तुम्ही DMart ला ओळखता का ? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता ? तुम्हाला Dmart कसे वाटते ? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किंवा एक ‘स्पिन व्हील’ दिले जाते ते फिरवल्यास एक पॉपअप येतो त्यात तुम्ही 5,000/- रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात असे भासवून सदर स्पर्धा इतर मित्रांसह व्हॉट्सॲपवर 5 ग्रुप / 20 मित्रांसोबत शेअर करा असे सांगितले जाते. स्क्रीनवरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने शेअर करत राहणे आवश्यक आहे असे सांगून आपणाकडून आपल्या बँक विषयी गोपनीय माहिती विचारू शकतात ज्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते असे सायबर विभागाने म्हटले आहे.

यासारख्या फसव्या लिंक ओपन करु नये तसेच ओटीपी शेअर करु नये, अनोळखी ॲप डाऊनलोड करु नये, अनोळखी फोनकॉलवर स्वतःची कोणतीही माहिती देवू नये. तसेच कोणतीही बँक खात्याशी संबंधीत माहिती जसे की, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. माहिती मागत असल्यास अशी गोपनीय माहिती कोणासही देऊ नये.समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये. तसेच स्वतःच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इ. च्या खात्याचा पासवर्ड स्वतःचा मोबाईल क्रमांक न ठेवता तो अंक / आकडे / चिन्ह अशा स्वरुपात ठेवावा असं आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.