त्यामुळे पुणे विमानतळ 'या' वेळेत वर्षभर बंद राहणार
पुणे विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम हवाई दलामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या २६ ऑक्टोबरपासून वर्षभर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंग यांनी दिली आहे. मात्र या कालावधीत विमानसेवेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कुलदीप सिंग म्हणाले, पुणे विमानतळावरून सध्या नऊ हजार प्रवासी ये-जा करत आहे. तसेच १३ विमानांची ये-जा सुरु आहे. मात्र, विमानतळाच्या धावपट्टीची क्षमता चार विमाने उड्डाण व चार उतरण्याची इतकी असून ती अपुरी आहे. त्यामुळे आगामी काळात ही क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच वर्षभर हवाईदलामार्फत धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. मात्र या कालावधीत विमानसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच कोणत्याही फ्लाईट्स रद्द करण्यात येणार नसून त्यांचे नियोजन हे दिवसभरात करण्यात येणार आहे. रोज साधारण ४५ विमानाचे उड्डाण सुरु राहणार आहे.