तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएची सिया गोयलच्या वडिलांवर मोठी कारवाई; दुकान सील, माल जप्त
पुणे केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल यांच्या कुटुंबाच्या दुकानावर महाराष्ट्र एफडीएने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन आणि संभाव्य भेसळीच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिया गोयलच्या कुटुंबाच्या मालकीच्या मसाल्यांच्या आणि सुकामेव्याच्या दुकानावर नोटीस बजावून मोठी कारवाई केली आहे. "मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी" द्वारे चालवल्या जाणाऱ्या या दुकानात कथित उल्लंघने आढळल्यानंतर नियामकाने पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व व्यावसायिक कामकाज तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
हे दुकान मध्य पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एफडीएच्या पथकाने दुकानाची तपासणी केली आणि अन्नसुरक्षेचे उल्लंघन तसेच संभाव्य भेसळीच्या संशयावरून कारवाई केली. तपासणीनंतर, त्या आस्थापनेला कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
छाप्यात ₹८.१४ लाख किमतीचा माल जप्त
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 'संत' आणि 'साधू' या ब्रँडच्या हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन वड्यांसह चार खाद्य उत्पादनांचे नमुने गोळा केले. तपासणीदरम्यान ₹८.१४ लाख किमतीचा एकूण ४,१७२ किलो माल जप्त करण्यात आला. उत्पादनाच्या लेबलवर चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्याने आणि अन्न भेसळीच्या शक्यतेमुळे, प्राथमिक तपासात असे उघड झाले की, ती आस्थापना अन्न सुरक्षा आणि मानके (FSS) कायद्यांतर्गत अनिवार्य नियमांचे पालन करत नव्हती. शिवाय, आवश्यक परवान्याचा तपशील अद्ययावत केलेला नव्हता.
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, भेसळयुक्त आणि नियमांचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्यभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर छापा टाकला.
एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, संबंधित आस्थापनेला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik

