रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:45 IST)

साखरेवस्तीतील खुनाचा उलगडा; रात्रीच्या वेळी ओले अंतरवस्त्र दिसले अन् पोलिसांनी खूनी शोधला

पोलीस तपासातील सुताचा धागा ओळखणं हे त्यांच्या कार्यशैलीचा भाग असला तरी हिंजवडी येथील एका गुन्ह्याचा तपास अशाच एका रंजक बाबीमुळे पूर्ण झाला आहे. साखरे वस्ती हिंजवडी येथे रविवारी (दि. 3) झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
कैलास अंकुश डोंगरे (वय 23, रा. तुषार सुदाम साखरे यांची रूम, साखरेवस्ती, हिंजवडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष विश्वनाथ माने (वय 38, रा. तुषार सुदाम साखरे यांची रूम, साखरेवस्ती, हिंजवडी पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सरस्वती संतोष माने (वय 35) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संतोष माने यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिसरात नवीन कोणी आले आहे का, अशा बाबींचा तपास सुरू झाला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
 
खुनातील आरोपीचा काहीच सुगावा लागत नव्हता. दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांना शेजारच्या मुलाची आंघोळ केलेली ओली अंडवेअर नजरेस पडली. मारणे यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की, घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत. पंरतु एक अंडवेअर फक्त ओली कशी? एवढया रात्री मुलाने आंघोळ का केली ? त्या अनुषंगाने पोलिसांनी शेजारच्या नागरिकांकडे वेगवेगळ्या पध्दतीने कसून विचारपूस करण्यास सुरुवात केली.
 
काही वेळेतच आरोपी कैलास डोंगरे याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. मयत संतोष व त्याची पत्नी हे दोघेजण आरोपी कैलास याच्या आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होते. त्या कारणावरून संतोषचा खून केला असल्याची कबुली कैलास याने दिली आहे.