मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:31 IST)

साईबाबांसमोर नतमस्तक झाला, नंतर पोटात चाकू खुपसून आत्महत्या

पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका 22 वर्षीय तरुणाने पोटात चाकू खुपसून घेत आत्महत्या केली. त्याआधी हा तरुणाने मंदिरात साईबाबांना हार घातला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. अति रक्तस्राव झाल्याने या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याने नोकरीच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे. राजेंद्र रमेश महाजन (वय 22, रा. पुणे, मूळ. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातून काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये आला होता.  बीएससीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात नोकरीनिमित्त आला होता. तो रांजणगाव परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत होता. त्याचे आई-वडील बुऱ्हाणपूरमध्येच राहत होते. तोच फक्त पुण्यात आला होता. त्याच्या घरी शेती असून, त्याचे कुटुंबीय शेती करत होते.
 
दरम्यान ही घटना घडली त्या दिवशी राजेंद्रने दिवसभर आई-वडील मित्र मैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर, आई-वडिलांना मी परत घरी येणार आहे. येथील नोकरी सोडली असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी देखील त्याला होकार देत परत ये आणि शेती कर. तसेच, त्यातून शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. त्याने देखील हे मान्य करत होकार देऊन फोन ठेवला. मुलगा येणार असल्याने कुटुंबीय देखील आनंदी होते.
 
परंतु, राजेंद्र रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास येथील मांगीरबाबा चौकातील साईबाबांच्या मंदिरात आला. त्याने येताना हार देखील आणला होता. मंदिरात आल्यानंतर साई बाबांसमोर नतमस्तक होत त्यांना हार अर्पण केला. त्यानंतर बाहेर येऊन तेथेच खिशातील चाकू पोटात खूपसून घेतला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच ही माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक युवराज पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येथे धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना राजेंद्रचा सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता.