मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (21:25 IST)

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली, 15 मेनंतर निर्णय होणार

पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणी कपातीची तलवार तूर्तास तरी टळली आहे. पुणे ग्रामीण आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे  याबाबत 15 मेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
पुणे शहरात पाणी कपात करायची की नाही, यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.  पुणे शहराला आणि ग्रामीण भागात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती, असे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले गेले. त्यानंतर पुण्यात 15 मेपर्यंत तरी पाणी कपात करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना यांमुळे दिलासा मिळाला आहे.
 
पुणे शहराला ज्या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणामध्ये 1.07 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 3.41 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 6.75 टीएमसी, टेमघर धरणामध्ये 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor