शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:45 IST)

पंजाब निवडणूक : चरणजीत सिंग चन्नी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
 
राहुल गांधींनी लुधियानामधील सभेत बोलताना ही घोषणा केली आहे.
 
या दरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांच्याशिवाय पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
 
"आम्हाला गरीब कुटुंबातील मुख्यमंत्री हवा आहे. आम्हाला असा व्यक्ती हवा आहे, जो गरीबांना समजू शकतो, भूक काय असते ते समजू शकतो, गरीब व्यक्तींच्या मनातील भीती समजू शकतो. कारण पंजाबला अशाच व्यक्तीची गरज आहे. हा निर्णय कठिण होता. पण तुम्ही सोपा केला. पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजितसिंग चन्नी असतील," असं चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना राहुल गांधी यांनी म्हटलं.
 
राहुल गांधींनी घोषणा करताच सिद्धू यांनी चन्नी यांचा हात वर केला आणि त्यानंतर राहुल गांधींनी दोघांना व्यासपीठाकडे आणलं. त्यावेळी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखडही तिथं होतं. राहुल गांधींनी घोषणेनंतर चन्नी-सिद्धू आणि जाखड तिघांची गळाभेट घेतली.
 
गेल्या काही दिवसांपासून सिद्धू त्यांच्या वक्तव्यांच्या माध्यमातून राज्यात ते पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात याचे संकेत देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, सुनील जाखडही चन्नी यांच्यावर हल्ला करत होते.
 
पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री
सप्टेंबर 2021 मध्ये चरणजीतसिंह चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. ही जबाबदारी सांभाळणारे ते राज्यातील पहिले दलित नेते ठरले.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधील नवज्योत सिंग सिद्धू, सुनील जाखड, अंबिका सोनी व सुखजिंदर सिंग रंधवा आदी नावं माध्यमातून पसरत होती. परंतु, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच चकित केलं होतं.
 
चमकौर साहीब विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले चरणजीत सिंग चन्नी त्यांच्या कुटुंबातील पहिलेच राजकीय नेते आहेत.
 
चन्नी यांनी 2007 साली पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा ते अपक्ष उमेदवार होते. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतलं. त्यामुळे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत चन्नी काँग्रेसचे उमेदवार म्हणून स्पर्धेत उतरले आणि विजयी झाले.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात चन्नी तंत्रशिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक कामकाज मंत्री होते.
 
चन्नी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
चरणजीत सिंग यांना तीन भाऊ आहेत- डॉक्टर मनमोहन सिंग, मनोहर सिंग व सुखवंत सिंग. चरणजीत सिंग चन्नी यांची पत्नी कमलजीत कौर डॉक्टर असून त्यांना दोन मुलगे आहेत.
 
चन्नी कुटुंबियांचे स्नेही असणारे बालकृष्ण बिट्टू यांनी बीबीसीचे सहायक पत्रकार पाल सिंग नौली यांना सांगितलं की, चन्नी कुटुंबियांच्या मालकीचा एक पेट्रोल पंप रोपड़ इथे आहे आणि त्यांच्याकडे एक गॅस एजन्सीसुद्धा आहे.
 
चन्नी यांचे वडील हर्ष सिंग काही वर्षं उपजीविकेसाठी अरबी देशांमध्ये होते. भारतात परतल्यावर त्यांनी मोहालीतील खरर इथे मंडप उभारणीचा व्यवसाय सुरू केला.
 
बालकृष्ण बिट्टू सांगतात त्यानुसार, तरुणपणी चन्नी त्यांच्या वडिलांसोबत काम करत असत. खरर नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्यानंतरसुद्धा चन्नी मंडप उभारण्याचं काम करत असत.
 
त्यांचे भाऊ डॉक्टर मनमोहन सिंग बीबीसीशी बोलताना म्हणाले की, चन्नी यांनी चंदीगढमधील गुरू गोविंद सिंग खालसा महाविद्यालयात शिकून पुढे पंजाब विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. त्यानंतर चन्नी यांनी पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
 
त्यांना अभ्यासात इतका रस होता की मंत्री झाल्यानंतरसुद्धा ते पंजाब विद्यापीठात पीएच.डी. करत होते.
 
चन्नी यांचा राजकीय प्रवास
अठ्ठावन्न वर्षीय चरणजीत सिंग यांचा राजकीय प्रवास १९९६ साली सुरू झाला. पहिल्यांदा ते खरर नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. याच दरम्यान ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दत्त यांच्या संपर्कात आले.
 
राजकारणातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये चन्नी रमेश दत्त यांच्या सोबत असायचे. काँग्रेसमधील दलित नेते चौधरी जगजीत सिंग यांच्याशीही चन्नी यांचा संपर्क होता, पण २००७ सालच्या निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी चमकौर साहीब मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचं ठरवलं. त्यानुसार ते लढले आणि जिंकलेसुद्धा.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2012 साली त्यांना उमेदवारी दिल्यावर ते पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकले. 2015 ते 2016 या कालावधीमध्ये पंजाब विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते म्हणून सुनील जाखड यांच्या खालोखाल चन्नी यांचंच नाव घेतलं जात असे.
 
चरणजीत सिंग चन्नी यांनी काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींशीही संपर्क ठेवला. काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. 2017 सालची निवडणूक जिंकल्यानंतर चन्नी यांना अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्या विरोधात आवाज उठवला जाऊ लागला, त्यात चन्नी यांचाही समावेश होता. पंजाब काँग्रेस समितीची धुरा नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडे देण्याचंही समर्थन चन्नी यांनी केलं होतं,
 
काँग्रेसचे पंजाबमधील प्रभारी हरीश राव यांना भेटण्यासाठी डेहराडूनला गेलेल्या पंजाबी मंत्र्यांच्या व आमदारांच्या प्रतिनिधीमंडळात चन्नी यांचाही समावेश होता. त्यांनी 2017 सालच्या निवडणुकीमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानार त्यांच्याकडे सुमारे 14.53 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
 
चन्नी आणि वादविवाद
राज्यात काँग्रेसचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हाच पंजाबमधील भाजपच्या एका नेत्याने तीन वर्षांपूर्वी चन्नी यांच्या संदर्भात घडलेल्या घटनेचा उल्लेख ट्विटरवर केला.
 
चन्नी यांनी मंत्रीपदावर असताना एका महिला आयएएस अधिकाऱ्याला कथितरित्या 'अनुचित संदेश' पाठवल्याचा आरोप 2018 साली झाला होता.
 
हे प्रकरण सुरू झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, "काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण माझ्या समोर आलं, तेव्हा मी मंत्री चन्नी यांना संबंधित महिला अधिकाऱ्याची माफी मांगायला सांगितलं, आणि चन्नी यांनी त्यानुसार माफी मागितली. यानंतर ते प्रकरण सुटलं."
 
हा संदेश चुकून संबंधित महिला अधिकाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात आला होता, आता हे प्रकरण मिटलं आहे, असं चन्नी यांनी स्वतःचा बचाव करताना म्हटलं होतं.