शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (14:28 IST)

राजस्थान : वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या नाहीत, तर 'या' 7 नावांवर होऊ शकतो विचार

vasundhara raje
दीपक मंडल
facebook
 राजस्थानमध्ये भाजपने निवडणूक जिंकली आहे.
 
विधानसभेच्या 199 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. काँग्रेसने 69 जागा जिंकल्या आहेत.
 
काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव स्वीकारत राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केलाय.
 
राजस्थानमध्ये भाजपच्या विजयात त्यांच्या दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जातंय.
 
मात्र, भाजपने कुणालाही मुख्यमंत्री चेहरा करून निवडणूक लढवली नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण बसणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय.
 
वसुंधरा राजे यांचा दावा किती भक्कम?
राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे सिंधिया यांच्याबद्दल असं बोलले जातंय की, त्यांना हायकमांडची पसंती नाही.
 
त्यामुळे प्रश्न पडतो की त्या नाही तर कोण?
 
वसुंधरा या राज्यातील अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी संपूर्ण निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार केला.
 
काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत वसुंधरा भाजपचा चेहरा असल्याचं सांगत आहेत.
 
पण भाजप हायकमांड आणि वसुंधरा यांच्यातील संबंध चांगले राहिले नसल्याचा दावा अनेकांनी केलाय. वसुंधरा यांच्याबद्दल असंही बोललं जातंय की त्यांचा आरएसएसमध्ये चांगला प्रभाव नाही.
 
पण वसुंधरा दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांच्या 50 नेत्यांनी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली असून त्यापैकी बहुतांश विजयी झाल्याचं बोललं जातंय.
 
विश्लेषकांचे म्हणणे आहे की वसुंधरा यांनी 50 आमदारांचा पाठिंबा मिळवला तर भाजप हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
 
पण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद गुप्ता म्हणतात की भाजप हायकमांडला वसुंधरा यांना मुख्यमंत्री बनवायचं नाहीए.
 
ते म्हणतात, “वसुंधरा राजे यांचे भाजप हायकमांडशी चांगले संबंध नाहीत. भाजप मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या जागी कुणालाही आणणार नाही. परंतु वसुंधरा यांना राजस्थानात येऊ देणं त्यांना आवडणार नाही.
 
वसुंधरा राजे यांचे 30 समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचं बोललं जात होतं. या निवडणुकीत आठ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
 
अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे या दोघांनी बंडखोर उमेदवार उभे केले असून त्रिशंकू विधानसभा झाल्यास असे विजयी उमेदवार त्यांना पाठिंबा देतील, असं बोललं जात होतं.
 
मात्र भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळाल्याने विजयी अपक्षांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 
1) दिया कुमारी - राजघराण्याचा चेहरा
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा नाहीत तर कोण या प्रश्नावर अनेकदा दिया कुमारी यांचं नाव पुढे येतं.
 
राजसमंदच्या खासदार दिया कुमारी यासुद्धा वसुंधरा राजे यांच्यासारख्या राजघराण्यातील आहेत आणि त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण भाजप हायकमांडच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
 
दियाकुमारी या जयपूरच्या राजघराण्याच्या सुपुत्री आहेत. जयपूरच्या माजी राजमाता गायत्री देवी यांचा इंदिरा गांधींसोबत छत्तीसचा आकडा होता.
 
त्यांची आई पद्मिनी देवी आणि वडील भवानी सिंग हे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक होते. दीयाकुमारी यांनी दिल्ली आणि लंडनच्या सर्वोत्तम शाळांमध्ये शिक्षण घेतलंय.
 
त्या जयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये राहतात आणि आमेरचा ऐतिहासिक जयगड किल्ला, महाराजा सवाई मानसिंग द्वितीय संग्रहालय ट्रस्ट आणि अनेक शाळांचा कारभार पाहतात.
 
राजस्थानचे वरिष्ठ पत्रकार त्रिभुवन यांच्या म्हणण्यानुसार पक्षाचे ज्येष्ठ आणि जुने नेते सांगतात की, त्या यामुळेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतात; कारण राणीच्या जागी राजकुमारीला आणणं केव्हाही अधिक सोयीचं असेल.
 
2) बाबा बालकनाथ - राजस्थानचे 'योगी आदित्यनाथ' होणार का?
अलवर जिल्ह्यातील तिजारा जागेवर रोहतक येथील अस्थल बोहरनाथ आश्रमाचे महंत हे भाजपचे उमेदवार आहेत. बोहर मठाच्या आठव्या महंतांना इथे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्यासारखं पाहिलं जातंय.
 
भाजप हायकमांड त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊ शकतं, असं मानलं जातंय. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांचं नाव झपाट्यानं पुढे आलंय.
 
बाबा बालकनाथ हे ओबीसी (यादव) आहेत. त्यांचे वडील सुभाष यादव हे नीमराना येथील बाबा खेतानाथ आश्रमात सेवा करायचे. त्यामुळे फार पूर्वीपासूनच बालकनाथांचा योगी होण्याकडे कल होता.
 
बाबा बालकनाथ येथे काँग्रेसचे इम्रान खान यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या जागेवर प्रचार केला होता.
 
इथच त्यांनी भारतातील कट्टरतावाद्यांचा हमासशी संबंध जोडताना इस्रायलच्या बाजूने वक्तव्य केलेलं.
 
अलवर लोकसभा मतदारसंघातून बालकनाथ प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
 
त्रिभुवन म्हणतात, "बाबा हे बालकनाथ यादव आहेत." यादव ही मूळ ओबीसी जात आहे आणि जाट, बिश्नोई, शीख इत्यादी उच्च ओबीसींच्या विरूद्ध वंचित ओबीसींचे प्रतिनिधित्व करतात. आतापर्यंत त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. कुठल्याही वादांमध्ये अडकलेले नसून ते सभ्य आहेत.
 
वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद गुप्ता म्हणतात, “लोकांना आश्चर्यचकीत करण्यावर भाजपचा भर असतो. भाजपवाले दियाकुमारींचं नाव घेतायत. मात्र बाबा बालकनाथ हे प्रबळ दावेदार असल्याचं दिसतंय.
 
योगी आदित्यनाथ ज्या नाथ पंथाचे आहेत त्याच नाथ पंथाचे बाबा बालकनाथ आहेत.
 
ते म्हणतात, “माझा विश्वास आहे की कुणीही, अगदी वसुंधरा यांनाही नाथ संप्रदायाच्या संताच्या नावावर आक्षेप नसेल. दिया कुमारी आणि राजेंद्र राठोड यांना मुख्यमंत्री बनवल्यास वसुंधरा यांना आक्षेप असू शकतो पण बाबा बालकनाथ यांच्याबाबत त्यांना आक्षेप घेता येणार नाही. कारण वसुंधरा राजे स्वत: भक्त असल्याचं सांगतात.
 
शरद गुप्ता म्हणतात, "दिया कुमारी या भाजपची निवड असल्या तरी त्यांच्याकडे प्रशासकीय क्षमता नाही. अशा स्थितीत वसुंधरा यांचा प्रभाव कमी करण्यासाठी बाबा बालकनाथ यांना भाजपची पसंती असू शकते.
 
3) गजेंद्र सिंह शेखावत - कठोर परिश्रम कामी येतील का?
गजेंद्र सिंह शेखावत हे पक्षात वसुंधरा राजे यांचे विरोधक मानले जातात.
 
जोधपूरच्या जागेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा पराभव करणारे शेखावत केंद्रात मंत्री आहेत.
 
शेखावत यांनी गेहलोत यांचा सामना केलाय. दोघेही एकमेकांविरोधात तिखट प्रतिक्रिया देताना दिसतात.
 
शेखावत यांच्यावर गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
 
काँग्रेस नेते भंवरलाल शर्मा यांच्यासोबतच्या त्यांच्या कथित ऑडिओ सीडी क्लिप एपिसोडमुळे शेखावत वादात सापडले होते.
 
यामध्ये शर्मा, आमदार विश्वेंद्र सिंह आणि गजेंद्र शेखावत यांच्यात संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला होता.
 
राजस्थानची सर्वात हॉट जागा मानल्या जाणाऱ्या आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा बालेकिल्ला असलेल्या जोधपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव करणारे गजेंद्र सिंह शेखावत हे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार त्रिभुवन यांच्या म्हणण्यानुसार, ते राजकारणात खूप महत्त्वाकांक्षी मानले जातात आणि एका निरीक्षकाच्या मते, त्यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळापासून सर्वोच्च पद हवं असल्याचा आरोप होतोय.
 
त्रिभुवनच्या म्हणण्यानुसार, गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं कारण ते निवडणुकीत खूप सक्रिय होते आणि स्वत: ला प्रबळ दावेदार म्हणून सादर करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. हे एक स्वाभाविक नाव आहे.
 
4) ओम बिर्ला - छुपे रुस्तम?
कोटाचे ओम बिर्ला सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते डार्क हॉर्स मानले जात आहेत.
 
ते भाजप आणि आरएसएसच्या बड्या नेत्यांचे जवळचे आणि विश्वासू मानले जातात. बिर्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे आहेत.
 
वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना 2003 ते 2008 पर्यंत ते संसदीय सचिव होते.
 
2008 आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय. 2014 मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. या निवडणुकीत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले.
 
त्रिभुवन यांच्या म्हणण्यानुसार, बिर्ला स्वत:ला लो-प्रोफाइल ठेवतात पण त्यांचा जनाआधार मजबूत आहे. याशिवाय पक्ष आणि संघावर त्यांची मजबूत पकड आहे.
 
त्यांच्या नावावर पक्ष हायकमांडचं एकमत होऊ शकतं, असे मानलं जातंय.
 
5) राजेंद्रसिंह राठोड : राजकीय हेराफेरीत निष्णात
राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राजेंद्रसिंह राठोड सुरुवातीपासूनच सांगत होते की, यावेळी भाजपला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
 
राठोड हे राजस्थान विद्यापीठाचे प्रसिद्ध विद्यार्थी नेते आहेत. 68 वर्षीय राठोड हे चांगल्या-वाईट काळात कायम पक्षासोबत राहिले आहेत.
 
वसुंधरा राजे यांच्या दोन्ही सरकारमध्ये राठोड हे अत्यंत शक्तिशाली मंत्री होते. मात्र केंद्रातील भाजपमधील बदललेले सत्तासंतुलन पाहून ते दिल्लीच्या जवळ गेले. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावाही बऱ्यापैकी प्रबळ मानला जातोय.
 
भाजपमधील त्यांच्या लवचिक राजकीय शैलीने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवलंय.
 
राजस्थानच्या राजकारणात भैरोसिंह शेखावत आणि अशोक गेहलोत यांच्या राजकीय शैलीत ते अगदी चपखलपणे बसतात आणि त्यांचा तळागाळातील लोकांशी खूप चांगला संबंध आहे.
 
त्रिभुवन म्हणतात, "1993 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले राठोड हे भैरोसिंह शेखावत यांचे विश्वासू होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले. पुढे ते वसुंधरा राजे यांच्या ट्रस्टमध्ये गेले. आता वसुंधराविरोधात भाजप हायकमांडच्या जवळ आहेत. एकंदरीत ते जातीय समीकरणांचे जाणकार मानले जातात. त्यांना हेराफेरीच्या राजकारणातील गुरु मानलं जातं.
 
6) अर्जुन मेघवाल - भाजपचा दलित चेहरा
काँग्रेसने जसं मागास जातीतील अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवलं होतं, तसंच भाजप अर्जुन मेघवाल यांना मुख्यमंत्री बनवू शकतं.
 
माजी आयएएस आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन मेघवाल हे बिकानेरचे खासदार आहेत आणि पक्षाचा दलित चेहरा आहेत.
 
त्यांच्याबद्दलची विशेष गोष्ट म्हणजे राजस्थानातील दलितांमध्ये त्यांच्या जातीला सर्वाधिक मतं आहेत.
 
नोकरशाहीत असलेले अर्जुन मेघवाल हे तळागाळातील नेते मानले जातात. डॉ. बी. आर. आंबेडकर ज्या स्थानावर होते त्या स्थितीत पोहोचलेले ते राज्यातील त्यांच्या समाजातील एकमेव व्यक्ती आहेत.
 
त्रिभुवन सांगतात की, जेव्हा ते भाजपमध्ये सामील झाले तेव्हा त्यांच्याकडे काँग्रेससारख्या अनुसूचित जातीच्या नेत्यांची लांबलचक यादी नव्हती.
 
त्यामुळे त्यांना झपाट्याने प्रगती करण्याची संधी मिळाली आणि आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी आपलं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं.
 
त्रिभुवन म्हणतात, "अलिकडेच एका दलित व्यक्तीची मुख्य माहिती आयुक्त पदावर नियुक्ती केल्यानंतर भाजपने त्याचं श्रेय घेतलं होतं. याला विरोध करणाऱ्या काँग्रेसबाबत ते म्हणाले होते की, कोणत्याही दलित व्यक्तीने या पदावर बसावं असं यांना वाटत नाही. त्यामुळे त्या पक्षाचा दलित चेहरा अर्जुन मेघवाल यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता आहे. कारण द्रौपदी मुर्मू यांना अध्यक्ष करून भाजप हा आदिवासींचा मित्र असलेला पक्ष असल्याचं दाखवून दिलंय.
 
भाजप आता ओबीसी-दलित संघटन आणखी मजबूत करू शकतो. त्यामुळे त्यांची निवड दलित किंवा ओबीसी उमेदवार असू शकतो.
 
राजस्थान निवडणुकीच्या निकालानंतर आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. जुन्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे.
 
7) अश्विनी वैष्णव आणि इतरही अनेकजण शर्यतीत
पक्षातील दिग्गज नेत्यांच्या तुलनेत नवे उदयोन्मुख नेतेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. पण भाजप हायकमांडच्या जवळची लोकं आणि भाजपशी संबंधित असलेले राजस्थानचे स्थानिक पक्ष नेते असंही सांगत आहेत की मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
 
मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनाच माहीत असल्याचं ते म्हणतात.
 
हरियाणात मनोहर लाल खट्टर, यूपीमध्ये योगी आदित्यनाथ, आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा किंवा उत्तराखंडमध्ये पुष्कर धामी यांना मुख्यमंत्री बनवण्याआधी त्यांना पद दिलं जातंय, हे कोणालाच माहीत नव्हतं.
 
त्रिभुवन यांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चर्चेत असलेली नावे बाजूला ठेवून अश्विनी वैष्णव यांना मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.
 
त्रिभुवन यांचं म्हणणे आहे की, भाजप हायकमांडही उलट डावपेच खेळू शकतं.
 
ते म्हणतात, “सध्याचे अध्यक्ष आदिवासी आहेत. उपराष्ट्रपती ओबीसी समाजातून येतात. खुद्द पंतप्रधान ओबीसी समाजातील असल्याने ते राजस्थानसाठी दलित उमेदवाराऐवजी ब्राह्मण किंवा ठाकूर उमेदवार निवडण्याचीही शक्यता आहे.
 
ते म्हणतात, "या नावांशिवाय भूपेंद्र यादव, यूपीमध्ये निवडणुकीचे नेतृत्व करणारे सुनील बन्सल, ओम माथूर यांचाही समावेश आहे. मात्र, ओम माथूर खूप म्हातारे झाले आहेत. पण त्यांचं नावही वेळोवेळी पुढे येतं.
 
त्रिभुवन सांगतात की, सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावं समोर येत आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कार्यशैली पाहता काही धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता आहे.