निवडणुकीत चुरस वाढणार, भाजपकडून तिघांचे अर्ज दाखल
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज उर्वरीत पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा असतानाच भाजपने मात्र तिसरा उमेदवारही रिंगणात उभा केला आहे. यामुळे शिवसेना व भाजपची थेट लढत रंगणार यात शंका नाही.
संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. यानुसार भाजपने पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी घोषित केली. यासोबतच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी धनंजय महाडीक यांच्या रुपाने तिसरा उमेदवारही भाजपने निवडणुकीत उभा केला आहे. या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, भाजपचे विधानसभेतील संख्याबळ पाहता दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी लढवेल आणि जिंकेलही, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.