बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:32 IST)

राममंत्राचे श्लोक – संत रामदास

saint samarth ramdas
राममंत्राचे श्लोक – संत रामदास
नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी । जडे गर्व ताठा अभीमान पोटीं । कसा कोणता नेणवे आजपारे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१॥
नको कंठ शोषूं बहू वेदपाठीं । नको तूं पडूं साधनाचे कपाटीं । घडे कर्म खोटें बहू तो दगा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२॥
तुला ही तनू मानवी प्राप्त झाली । बहू जन्मपुण्यें फळालगिं आली । तिला तूं कसा गोंविसी वीषयीं रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३॥
जरी ही तनू रक्षिसी पुष्ट कांहीं । तरी भोग तो रोग होईल देहीं । विपत्ती पुढें ते नये बोलतां रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४॥
खुळे हस्तपादादि हे भग्र होती । दिठी मंद होवोनियां कर्ण जाती । तनू कंप सर्वांग होती कळा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥५॥
कफें कंठ हा रोध होईल जेव्हां । अकस्मात तो प्राण जाईल तेव्हां । तुला कोण तेथें सखे सोयरे रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥६॥
तुझें बाळ तारुण्य गेलें निघोनी । कळेना कसे लोक जाती मरोनी । करीसी मुलाची स्वहस्तें क्रिया रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥७॥
दुराशा नको रे परस्त्री धनाची । नको तूं करूं नीचसेवा जनाची । पराधीन क इआ भला दीससी रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥८॥
मदें डोलसी बोलसी साधुवृंदा । कसें हीत तूं नेणसी मंदे बुद्धिमंदा । रिकामाचि तूं गुंतशी वाउगा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥९॥
बहू व्याप संताप तो मूळमापा । गतायुष्य द्रव्यें नये कोटि बापा । कळेना तुला कोणता तो नफा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१०॥
तुझे आप्त द्रव्यार्थ नुस्तेचि होती । तून हे चित्तेमाजिम कीं बोळवीती । असें जाणुनी हीत कांहीं करा रे  । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥११॥
कुटुंबी स्त्रिया पुत्र ते दासदासी । बहू पोषिसी सोसुनी दु:खराशी । त्यजी भार काबाड ओझें किती रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१२॥
बहू इच्छिसी कीर्ति सन्मान कांहीं । सुखाचा तुला अंतरीं लेश नाहीं । फुकाचें मुखीं नाम तें कां नये रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१३॥
रवीसूत ते दूत विक्राळ येती । तुझ्या लिंगदेहासि ओढूनि नेती । तुला खंडिती मुंडिती दंडिती रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१४॥
नको वीषयीं फारस मस्त होऊं । नको मानदंभामधें चित्त गोवूं । नको भस्म लावूं जटाभार कां रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१५॥
नको फार मंत्राग्रिच्या मंत्रदीक्षा । नको जारणामारणादी अपेक्षा । कळायुक्त चातुर्य तें वीकळा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१६॥
नको योग अष्टांग तो रोध प्राणा । नको कृच्छ्रचांद्रायणीं हट्ट जाणा । अपभ्रंश हा मार्ग कीं वोखटा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१७॥
कदापी घडेना व्रतें यज्ञदानें । नसे द्रव्य गांठीं करावें जयानें । घडेना घडे यद्यपी कां फुका रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१८॥
नसे सत्य कांहीं दिस दों दिसांचें । तुला लूटिती चोरटे लोक साचे । स्त्रिया पुत्र कामा न येती तुला रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१९॥
नको तूं कदापी करूं तीर्थयात्रा । तनूदंडनीं क्षीणता सर्व गात्रां । करी ग्रस्त आयुष्य तूं कोणसा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२०॥
तुला येम पाशीं करी बद्ध जेव्हां । सखा कोणता सोडवी सांग तेव्हां । यमाला कदापी दया ते न ये रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२१॥
तपस्वी मनस्वी भले पार गेले । दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले । चिरंजीव कल्पायु गेले किती रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२२॥
बहू कामधंद्यांमधें धांव घेसी । किती नांवरूपा जगीं मीरवीसी । कशाला तुला उंट घोडे नगारे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२३॥
म्हणे देश माझे भुमी गांव वाडे । शिबीकासनीं बैससी उंच लोडें । कसा उंच तूं मंचकीं लोळसी रे  । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२४॥
दशग्रीव लंकापुरीं मस्त झाला । अकस्मात गेला पुरीमाजिं घाला । चिरंजीव दे राज्य बीभीषणा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२५॥
अधोमूख विष्ठेमधें मायपोटीं । पचे पिंड हा सोसुनी दु:खकोटी । स्मरेना कसें लाज नाहीं तुला रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२६॥
असे भोगुनी पंचचत्वारिमासीं । पुढें दैवयोगें सख्या जन्मलासी । कसा वीसरे ध्यान सोहं पुढें रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२७॥
कळे वायुचा स्पर्श होतांचि जेव्हां । रडे बाळ कोहं म्हणे जीव तेव्हां पुढें खेळ नानापरी खेळसी रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२८॥
दिसंदसि माता पिता बंधु जाणे । परी रोग नाना करी तेथ ठाणें । जरी दैवयोगें पुढें वांचला रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२९॥
करी लग्रमुंजी पितामाय त्याचे । करी शाहाणा मारुनी रूप साचें । करी पोटधंदा भला चांगला रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३०॥
बहू पाळिलें पोषिलें मायबापीं । निघे भिन्न निंदूनियां पापरूपी । स्त्रियेचे मुळें शेवटीं दुर्गती रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३१॥
शतायू नव्हे पूर्ण आयुष्य कांहीं । असें हीत आहीत तें आद्य पाहीं । अशाहीमधें बाल तारुण्य सारें । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३२॥
करीशील धर्माश्रमा अस्त जेव्हां । बहू घातपाती घरीं होय तेव्हां । भरी पोट पोषीं कुटुंबा बरा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३३॥
रवीऊदयो अस्त तो पोटधंदा । स्तवी आर्जवी तो करी येरनिंदा । कळेना पुढें काय होणार तें रे  । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३४॥
बहू ढीग मागें पुढें मोहरांचे । मदोन्मत्त होऊनियां तेथ नाचे । असे गर्व त्यालगिं नर्कासि थारे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३५॥
अलंकारस्थानीं तनू सज्जवीतो । मनी दर्पणीं पाहुनी रंजवीतो । कळेना जळे सर्पणीं रूप तें रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३६॥
बहू द्रव्य गांठीं पुन्हां मेळवीसी । गुरू विप्र बंधू कसे चाळवीसी । दुराशा कशाला मशाला पुढें रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३७॥
जरी क्षीण देहापरी वृद्धकाळीं । करीती स्त्रिया सूत नातू ढवाळी । धना ऊचकी लागतां गूचकी रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३८॥
रवी जे घडी हाणितो काळ जेव्हां । श्रुती शब्द हे गर्जती तास तेव्हां । म्हणे क्षीण आयुष्य गेले तुझें रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥३९॥
कसी जन्मुनी माय त्वां वांझ केली । कसी लाज वंशा कुळा लवियेली । भुमीभार धोंडा पशू हा खरा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४०॥
कसा कोणता काळ येईल केव्हां । दिनासारखा काळ नेईल तेव्हां । तुझें वित्त तारुण्य लोपेल सारें । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४१॥
तुला दंडिती खुडिती कुंभपाकीं । तुला खंडुनी अग्निकुंडांत टाकी । तुला ओढिती सांडसें तोडिती रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४२॥
असा उंच भोगूनियां कल्पकोटी । पुन्हां जन्म घे लक्षचौर्‍यांशि कोटी । महासंकटीं हिंपुटी जीव सारे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४३॥
नको सोंग छंदें करूं ढोंग कांहीं । नको शिष्यशाखा मठीं सूख नाहीं । महंतीमुळें नाश होतो तपा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४४॥
नको चाउटी वाउगी या जनांसी । हरीचिंतनीं ध्यास लावी मनासी । अमोलीक हा काळ जातो वृथा र । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४५॥
महा घोर हा थोर संसार मोठा । कळे संतसंगे समूळींच खोटा । कळे भक्ति मुक्ती विरक्तीच गा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४६॥
त्यजा दुष्टसंगा पहारे भल्यासी । करा हीत येऊं नका गर्भवासीं । जसें अंतिंचें दु:ख होतें जिवा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४७॥
बहू भोगितां पूढती नर्क आहे । असें जाणुनी त्या सुखामाजिं राहें । प्रपंचीं उगा मारिसी कां गपा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४८॥
कळे साधनें याविणें सर्व निंदी ॥ हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदी । हरे नाम हे माळिका साधका रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥४९॥
 
॥ श्रीराममंत्र श्लोकसंख्या  ॥४९॥