डाऊ पाच हजार जणांना घरी बसविणार
अमेरिकेत आर्थिक मंदीने आता भयावह स्वरूप धारण केले आहे. अनेकांच्या नोकर्या या मंदीने गिळंकृत केल्या आहेत. या मंदीची नवी शिकार रसायन क्षेत्रातील अग्रणी डाऊ ही कंपनी बनली आहे. कंपनीने आजच पाच हजार जणांची नोकरकपात आणि वीस प्रकल्पही बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कंपनी आपले अनेक लहान व्यवसाय विकून टाकणार आहे. मंदीला सामोरे जाण्यासाठी खर्च कपात हा एकमेव 'अजेंडा' राबविण्याचे कंपन्यांनी ठरविले आहे. त्यामुळेच नोकरकपात मोठ्या प्रमाणावर होत आहे. डाऊ ही रसायन क्षेत्रातील जगातील बड्या कंपनींपैकी एक आहे. आज जाहीर केलेल्या योजनेनुसार कंपनी २०१० पर्यंत सातशे दशलक्ष डॉलर्स रूपये वाचविणार आहे. याशिवाय कंपनी १८० प्रकल्प तात्पुरते बंद करणार असून सहा हजार तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना घरी बसविणार आहे. कोणते प्रकल्प बंद करणार व कोणत्या प्रकल्पातील कंपन्यांना काढून टाकणार याविषयी अजून अनिश्चितता आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, भारतात भोपाळ येथे याच कंपनीच्या प्रकल्पात गॅस गळती झाली होती. सध्या पुण्याजवळ याच कंपनीचा प्रकल्प उभा रहात असून त्याला वारकर्यांनी मोठा विरोध केला आहे.