बोर्डाने केली घोषणा इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकालाची तारीख ठरली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. दोन्ही इयत्तांचे परीक्षांचे पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परिणामी सध्या निकालपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच येत्या १० जूनपर्यंत इयत्ता बारावी तर इयत्ता दहावीचा निकाल येत्या २० जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. तशी माहिती मंडळाने दिली आहे.
शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशीरा लागेल की काय, अशी चिन्हे होती. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत होते. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे लेखी परीक्षा झाली नव्हती. यंदा ती झाली आहे. त्यातच आता निकाल वेळेवर लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता मंडळाने निकालाची माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे. राज्यात इयत्ता दहावीच्या १६ लाख ३९ हजार १७२ आणि इयत्ता बारावीच्या १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. निकाल वेळेत जाहीर होणार असल्याने पुढील प्रवेश प्रक्रियाही त्यानंतर लवकरच सुरू होणार आहे. परिणामी, पुढील शैक्षणिक वर्षाला विलंब होणार नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.