मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 9 मे 2022 (21:35 IST)

नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

ashok chouhan
श्री संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.
 
मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन मुक्ताईनगर येथील रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली होती. या मागणीची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन आज या संदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला ॲड. पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. भोसले, जळगावच्या अधीक्षक अभियंता श्रीमती गिरासे आदी अधिकारी उपस्थित होते.
 
मुक्ताईनगर येथे दर तीन महिन्यांनी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी वारकऱ्यांसह लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात, त्याशिवाय 25 मे रोजी श्री संत मुक्ताई पुण्यतिथी असून यावेळी साधू-महंत, वारकरी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. ती लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी नवीन मुक्ताबाई मंदिर ते मुक्ताईनगर शहरापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. या रस्त्याच्या कामाचा राज्य रस्ते प्रकल्पांमध्ये समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुक्ताईनगर शहर ते संत मुक्ताबाई यांचे जुने मंदिर या रस्त्यावरील खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही मंत्री. श्री. चव्हाण यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.